पुण्यात २४ तासात १४४ रुग्ण कोरोना मुक्त

पुणे, दि. १६ मे २०२०: राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक कोविड १९ रुग्ण पुण्यामध्ये आहेत. मात्र अशातच एक चांगली बातमी काल समोर आली. पुण्यात नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या वाढत असल्याचे आकडे पुढे येत असून, शुक्रवारी दिवसभरात १४४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंतच्या रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे १ हजार ६३० रुग्ण ठणठणीत झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, काल दिवसभरात १०६ जण कोरोनाबाधित सापडले असून, पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने पुण्यात पावणेदोनशे रुग्णांचा बळी घेतला आहे.

पुणे शहरात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १३२ रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यातील ३३ जण व्हेंटिलेटरवर असल्याचे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. कोरोना तपासणीचा वेग वाढवून रोज किमान दीड हजार नागरिकांच्या घशातील द्रव्यांचे नमुने चाचणी करण्यासाठी घेण्यात आले आहेत. याच आकड्याची आपण आधीच्या आकड्यांशी तुलना केली तर ती केवळ साडे सहाशे ते सातशे इतकी होती.

आता ‘स्वब’ घेण्याचे प्रमाण दुपटीने वाढवल्याने रुग्ण संख्येत भर पडत आहे. आतापर्यंत सर्वाधिक १ हजार ६५२ जणांची शुक्रवारी दिवसभरात तपासणी झाली असून, त्यातील १०६ नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल आला आहे. शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ३ हजार ९३ नागरिकांना कोरोना झाल्याची नोंद आहे. त्यातील १ हजार ६३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १७४ रुणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयासह खासगी रुग्णालयांत सध्या १ हजार २८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, सध्या अजूनही काही प्रमाणात मृत्यू होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा