PMPML च्या ताफ्यात दाखल होणार नव्या १५० ई-बसेस!

पुणे, १ जानेवारी २०२१: इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून Faster Adoption and Manufacturing of Electric Vehicles – II ही योजना सुरु केली आहे. यासाठी महामंडळाने ६०० इलेक्ट्रिकल बसेस उपलब्ध होणेकरीता केंद्राकडे प्रस्ताव दाखल केला होता.यास अनुसरून १२ मीटर, एसी, विथ आॅटो ट्रान्समिशन, बीआरटी १५० इलेक्ट्रिकल बस जीसीसी तत्वावर घेणेस केंद्राची मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये प्रती बस ५५ लाख रुपयांचे अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये ७५ बसेस व डिसेंबर २०२१ अखेर ७५ बसेस अशा १५० ई-बसेस महामंडळाच्या संचलनात उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी पुणे मनपा ९० आणि पिंपरी-चिंचवड मनपा ६० बसेस संचलनात राहणार असून यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होणार आहे.

यापूर्वी महामंडळाने सन २०१८-१९ मध्ये ५० ई- बसेस जीसीसी तत्वावर संचलनात आणल्या असून, या दिलेल्या वर्कऑर्डरमुळे एकूण ३०० ई-बसेस महामंडळाच्या संचलनात राहणार असून थोड्याच कालावधीत अजून १२ मीटर बीआरटी ३५० ई-बसेस भाड्याने घेण्याची नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यामुळे भारतात पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही ६५० इतका सर्वात मोठा ई-बसेसचा ताफा असणारी सार्वजनिक वाहतूक संस्था होणार असून यामुळे पुणे पिंपरी-चिंचवड व परिसरातील सर्व नागरिक, आयटी व औद्योगिक क्षेत्राला याचा उपयोग होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा