नवी दिल्ली, दि. १६ मे २०२०: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली काल निर्माण भवन येथे कोविड -१९ वरील उच्चस्तरीय मंत्रिगटाची (जीओएम)१५ वी बैठक पार पडली. नागरी उड्डयन मंत्री हरदीप एस. पुरी, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, नौवहन आणि रसायन व खते राज्यमंत्री मनसुख लाल मांडवीय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे तसेच संरक्षणदल प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते.
जागतिक स्तरावर तसेच देशातील कोविड -१९ प्रकरणांच्या सद्यस्थितीबद्दल सविस्तर सादरीकरण करण्यात आले. जगभरात कोविड -१९ बाधितांची एकूण संख्या ४२,४८,३८९ आहे, तर २,९४,०४६ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण ५.९२ टक्के आहे, तर भारतात कोविड -१९ बाधितांची एकूण संख्या ८१,९७० असून २,६४९ जणांचा मृत्यू झाला आहे आणि मृत्यूचे प्रमाण ३.२३ टक्के आहे. आतापर्यंत एकूण २७,९२० लोक बरे झाले आहेत आणि गेल्या २४ तासांत पाहिले तर,१,६८५ रूग्ण बरे झालेले आढळले. यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर ३४.०६ टक्के इतका वर गेला आहे. लॉकडाऊनचा परिणाम रुग्ण दुपटीने वाढण्याच्या गतीवर झाला असून लॉकडाऊन पूर्वीच्या आठवड्यातील ३.४ दिवसांवरून सुधारून गेल्या आठवड्यात १२.९ दिवसांवर आला आहे.
मंत्रीगटाने कोविड -१९ ला रोखण्याची रणनीती आणि व्यवस्थापनासंबंधी बाबी तसेच केंद्र व विविध राज्यांकडून केलेल्या उपायांवर सखोल चर्चा केली. देशाच्या ७९ टक्के प्रकरणात ३० नगरपालिका क्षेत्रे असल्याचे मंत्रिगटाला सांगण्यात आले. कोविड-१९ व्यवस्थापन धोरणाचा भर सर्वात जास्त बाधित रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू असलेल्या राज्यांवर तसेच उपचार आणि घटक प्रकरणाच्या व्यवस्थापनावर असणे आवश्यक आहे. यासाठी संसर्गाचे वेळेवर निदान आणि संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे हे सर्वोत्तम मार्ग असल्याचे मंत्रिगटाने नमूद केले. परदेशातून परत आलेले आणि स्थलांतरित मजूर यामुळे विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांसमोर उद्भवणाऱ्या आव्हानांवर देखील चर्चा केली.
मंत्रिगटाला हे देखील सूचित केले गेले की आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड -१९ च्या उत्तम आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी, मूळ कारणे व आवश्यक कार्यवाही यासंबंधी प्रतिबंधित क्षेत्र व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या विविध निर्देशक शिफारसी आधीच राज्य / केंद्रशासित प्रदेशांना सामायिक केल्या आहेत.
मंत्रिगटाला देशातील वाढत्या वैद्यकीय पायाभूत सुविधांविषयीही माहिती देण्यात आली आणि सांगण्यात आले की आजपर्यंत एकूण ८,६९४ सुविधा आहेत ज्यात ९१९ समर्पित रुग्णालये, २,०३६ रुग्णालये, २,०३६ कोविड आरोग्य केंद्रे आणि ५,७३९ कोविड केअर सेंटर आहेत ज्यात गंभीर रुग्णांसाठी एकूण २,७७,४२९ बेड आहेत. २९,७०१ आयसीयू बेड आणि काळजी केंद्रांमध्ये ५,१५,२२५ अलगीकरण बेड उपलब्ध आहेत. तसेच आत्तापर्यंत देशात कोविड -१९ चा सामना करण्यासाठी आता १८,८५५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्राने ८४.२२ लाख N95 मास्क आणि / ४७.९८ लाख वैयक्तिक संरक्षण उपकरणे (पीपीई) राज्ये / केंद्रशासित प्रदेश / केंद्रीय संस्थांना उपलब्ध करुन दिली आहेत. देशांतर्गत उत्पादकांनी दररोज सुमारे ३ लाख पीपीई उत्पादन क्षमता गाठली आहे आणि नजीकच्या भविष्यात देशाची गरज भागविण्यासाठी पुरेसे आहे अशी माहितीही मंत्रिगटाला देण्यात आली. याव्यतिरिक्त, देशांतर्गत उत्पादकांकडून व्हेंटिलेटरचे उत्पादन देखील सुरू झाले आहे आणि ऑर्डर देण्यात आल्या आहेत.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मंत्रिगटाला माहिती दिली की देशात चाचणीची क्षमता ५०९ सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज १,००,००० चाचण्यांपर्यंत वाढली आहे. आतापर्यंत देशात सुमारे २० लाख एकूण चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (एनसीडीसी) देशाच्या सेवेत रिअल टाईम पीसीआर टेस्टिंग कोविड -१९ चाचणीसाठी पूर्ण स्वयंचलित, उच्च तंत्रज्ञान असलेले कोबास ६८०० आणले आहे. कोबास ६८०० २४ तासात सुमारे १२०० नमुन्यांची चाचणी करेल. सध्या चाचणी किटची उपलब्धता पुरेशी आहे आणि आयसीएमआरच्या १५ डेपोमार्फत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना दिली जात आहे.
परराष्ट्र मंत्रालय, नागरी उड्डाण मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहकार्याने विविध देशांमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहितीही मंत्रिगटाला देण्यात आली. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे १२,००० भारतीयांना संबंधित राज्यात परत आणले गेले असून विलगीकरणात ठेवले आहे. राज्यात आल्यावर प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी, राज्यातील संस्थात्मक विलगीकरण सुविधा निहित मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.
प्रीती सुदान, सचिव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण ), राजेश भूषण, ओएसडी / सेक्रेटरी (आरोग्य आणि कुटुंब कल्याण), प्रदीपसिंग खरोला, सचिव (नागरी उड्डाण ), अनुप वाधवन, सचिव (वाणिज्य), बलराम भार्गव, डीजी-आयसीएमआर, आनंद स्वरूप, डीजी, आयटीबीपी, दम्मू रवी, अतिरिक्त सचिव (एमईए), अनिल मलिक, अतिरिक्त सचिव (एमएचए), डॉ.सी.एस. महापात्र, अतिरिक्त सचिव (आर्थिक बाबी), . लव अग्रवाल, संयुक्त सचिव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय )माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी