डोंबिवली ,११ ऑगस्ट २०२० : शासनाच्या निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम आकारणाऱ्या रुग्णालयांना केडीएमसीने दणका दिला आहे. आतापर्यंत तब्बल 16 लाखांची रक्कम रुग्णालयांकडून वसूल करत रुग्णांना परत दिल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिली आहे. त्याशिवाय आणखी १५ रुग्णालयांना ३१ लाख रुपयांच्या बिलांप्रकरणी केडीएमसीने नोटीस पाठवली आहे आणि त्याबद्दल पडताळणी सुरू आहे.
कोरोनाने मध्यमवर्गीयांसह अनेकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यात काही रुग्णालयांनी तर अक्षरशः रुग्णांची लूट चालवल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. शासकीय रकमेनुसार बिलाची आकारणी करण्याचे निर्देश असतानाही काही रुग्णालये अवाजवी दराने बिलाची आकारणी करत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक नेमण्यात आले .
विनय कुलकर्णी हे या पथकाचे प्रमुख असून या पथकाने आत्तापर्यंत १५ रुग्णालयांना नोटीसा बजावून ३१ लाख ४५ हजारांची रक्कम आक्षेपित केली आहे. त्यापैकी १६ लाख १५ हजार रुपयांची रक्कम रुग्णालयांकडून वसूल करुन रुग्णांना परत करण्यात आली आहे. तर काही रक्कम प्रत्यक्ष बिलातून कमी करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे