कानपुर, ९ जून २०२१: उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात जवळपास १७ जणांचा मृत्यू झाला आहे. साचेंदी येथे बस आणि लोडर यांच्यात थेट टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर बस पलटी झाली.
अपघाताबाबत आयजी मोहित अग्रवाल म्हणाले की बस आणि ऑटो मध्ये झालेल्या अपघातात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. हॅलेट रुग्णालयात चार जणांवर उपचार सुरू आहेत. बस लखनौहून दिल्लीकडे जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, बस शताब्दी ट्रॅव्हल्सची होती, ती वेगात होती. या अपघातात आतापर्यंत १७ जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे, तर १०-१५ लोक जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. असे सांगितले जात आहे की मृतांमध्ये बहुतांश मजूर आहेत, जे बिस्किट कारखान्यात काम करायचे. ते लोडरमध्ये होते.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही मदत देण्यात येणार आहे. पीएमएनआरएफ करून मृतांच्या कुटुंबियांना २-२ लाख आणि जखमींना ५०,००० मदत दिली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे