औंध: मुळा नदीच्या तीरावर वसलेले हे ऐतिहासिक विठ्ठल रुक्मिणी मंदिर १७ व्या शतकातील आहे. केदार राव शेंदे आणि साळुबाई शिंदे यांच्या कारकीर्दीत हे मंदिर बांधले गेले होते. विलोभनीय अशी विठ्ठलाची आणि रुक्मिणी ची मूर्ती येथे स्थानापन्न आहे. गोपुर स्थापत्य शैलीनुसर या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा भव्य स्वरूपात साजरा केला जातो. नयनरम्य अशी विद्युत रोषणाई या वेळी करण्यात येत असते. अतिशय विलोभनीय असे हे दृश्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येथे येत असतात. १ जानेवारी ते ८ जानेवारी दरम्यान आठ दिवस हा सोहळा चालू असतो. यंदा या सोहळ्याचे ९ वे वर्ष आहे. या दरम्यान पहाटे ४.३० ते ६.३० पर्यंत काकडा आरती आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केले जाणार आहे. दुपारी १२ ते ४ पर्यंत महिला भजनी मंडळ तर्फे भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ४ ते ५ पर्यंत हरिपाठ होणार आहे. सायंकाळी ६.३० ते ८.३० हरिकिर्तन होणार आहे ज्यामध्ये ८ दिवस दररोज नामांकित कीर्तनकार येथे येत असतात व रात्री ९ नंतर अन्नप्रसद आयोजित केला गेला आहे.
या व्यातरीक्त येथे वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असतात ज्या मध्ये आषाढी एकादशी, काकडा आरती, दैनंदिन भजन तसेच इतर सामाजिक हितार्थ कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. मंदिर व्यवस्थापन व आयोजन जय भवानी मित्र मंडळ, छत्रपती प्रतिष्ठान, औंध गाव भजनी मंडळ तसेच समस्थ औंध ग्रामस्थ यांच्या मार्फत केले जाते. मंदिराची देखरेख जय भवानी मित्र मंडळ व छत्रपती प्रतिष्ठान यांच्या मार्फत केली जाते.
विशेष आकर्षण म्हणजे येथे करण्यात येणारी विद्युत रोषणाई असते. मुळा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिराची प्रतिमा नदीच्या पात्रात रात्रीच्या वेळेस आकर्षित दिसते. हे दृश्य बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. या शिवाय नदी काठी असल्याने येथे विलक्षण शांतता असते तसेच मंदिराच्या आवारात हिरवळ असल्याने येथे येणाऱ्यास सुखद अनुभव मिळतो.