१८ महिन्यांचे काम ६ वर्षातही पूर्ण झाले नाही, करार रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या नागपूर जि.प.अध्यक्षांच्या सूचना

नागपूर, २५ ऑगस्ट २०२३: ज्याने आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करण्याचा ठेका घेतला आणि ६ वर्षातही ते पूर्ण केले नाही. अशा आशीर्वाद बिल्डर्सचा करार रद्द करण्याबरोबरच त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना, जि.प.अध्यक्षा मुक्ता कोकडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिल्या.

ठेकेदाराचे सर्व कामांचे कंत्राट रद्द करून उर्वरित कामांची नव्याने निविदा काढण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मौदा येथील आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामासाठी सदर ठेकेदाराला फेब्रुवारी २०१७ मध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आला होता, जो अद्याप पूर्ण झालेला नाही. या ठेकेदाराने जिल्ह्यातील अन्य काही कामेही अपूर्ण ठेवली आहेत.

तसेच एका ठेकेदाराने उपकेंद्राच्या हद्दीतील भिंतीला लागून ७०-८० ट्रक गिट्टी-मुरुम टाकले, ज्यामुळे भिंतीचे नुकसान झाले. जि.प.अध्यक्षा कोकडे यांनी त्या ठेकेदाराला भिंत बांधून द्या, अन्यथा संपूर्ण साहित्य जप्त करु, अशा सूचना दिल्या. या बैठकीला उपाध्यक्षा कुंदा राऊत, सभापती मिलिंद सुत्ते, प्रवीण जोध, राजकुमार कुसुंबे, सदस्य रश्मी बर्वे, दिनेश बंग, संजय झाडे, व्यंकट कारेमारे व अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा