उत्तर प्रदेशात पावसाचे थैमान, १९ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेश, १२ सप्टेंबर २०२३ : उत्तर प्रदेशात झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडवली असून, गेल्या चोवीस तासांत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी लखनौमध्ये २० ते २५ फुटांपर्यंत पाणी साचले होते. गेल्या १२ तासांत येथे ९३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संरक्षणमंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी शहरांची स्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली.

लखनौखेरीज मथुरा, कानपूर, बाराबंकी, मुरादाबाद, हरदोई येथेही जोरदार पाऊस झाला. राज्याच्या आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांत पाऊस आणि वीज पडून झालेल्या अपघातात, १९ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे हवामान खात्याने बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगालसह देशातील १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

लखनौ, कानपूर, अयोध्या, गोरखपूरसह उत्तर प्रदेशातील ३१ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मुरादाबाद येथे तीन दिवसांच्या मुसळधार पावसाने भात आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा दंडाधिकारी मानवेंद्र सिंह यांनी नुकसान झालेल्या शेतांना भेट दिली आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा