पिंपरी, २ जानेवारी २०२२ : पिंपरी-चिंचवड शहरामधील पिंपळे सौदागर आणि राहटणी परिसरात नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शनिवारी मध्यरात्री अज्ञात टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. कोयते आणि सिमेंटच्या गट्टूंनी वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांनी सांगितले. टोळक्याला अडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अज्ञातांनी धक्काबुकी केली असून, ते रिक्षातून फरार झाले.
नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. सांगवी आणि वाकड पोलिस ठाण्याची हद्द असलेल्या राहटणी आणि पिंपळे सौदागर येथे मध्यरात्री एकूण २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. शनिवारी ३१ डिसेंबर असल्याने शहरात दीड हजारांपेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त होता. तरी देखील अज्ञात चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षातून येऊन दिसेल त्या दुचाकी, चारचाकीला लक्ष्य करीत कोयत्याने आणि सिमेंटच्या गट्टूने वाहनांची तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पकडण्याचा प्रयत्न वाकड पोलिस कर्मचाऱ्याने केला; पण त्यांना धक्काबुकी करून अज्ञात तोडफोड करणारे पसार झाले. याबाबत सांगवी आणि वाकड पोलिस अधिक तपास करीत असून, शहरातील गुन्हेगारी रोखण्याबाबत पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यापुढे मोठे आव्हान असेल हे मात्र नक्की.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील