पुणे, ३० एप्रिल २०२१: पीएम केअर फंड मधून ‘ससून’ला गेल्या वर्षी दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी २५ व्हेंटिलेटर बंद असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत ससूनकडून करण्यात आला होता. या दाव्यानंतर प्रशासनाने हे व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि २५ पैकी २१ व्हेंटिलेटर सुरु केले आहेत. आता ही व्हेंटिलेटर महापालिका रुग्णालय आणि ससूनमध्ये वापरण्यात येणार आहेत. संकट काळात २१ व्हेंटिलेटर रुग्णसेवेसाठी उपलब्ध झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्समधून पुणे शहराला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सपैकी ८० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर ससूनला दिले होते. त्यापैकी ३४ व्हेंटिलेटर्स किरकोळ कारणांसाठी पूर्णपणे बंद ठेवले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याशी संपर्क करून बंद ठेवलेले व्हेंटिलेटर महापालिकेच्या ताब्यात घेतले आणि हे व्हेंटिलेटर दुरुस्त करण्यासाठी एका विशेष तंत्रज्ञच्या माध्यमातून व्हेंटिलेटर सुरू करण्यात यश आलं आहे.
राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ‘ससून’मधील व्हेंटिलेटर किरकोळ कारणासाठी आताच्या परिस्थितीत बंद असणे, हे अत्यंत गंभीर होते. म्हणूनच याची तातडीने दखल घेतली आणि हे व्हेंटीलेटर अवघ्या आठ दिवसात सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला यशही आलं. दुरुस्त झालेल्या व्हेंटिलेटरपैकी ८ व्हेंटीलेटर हे बिबबेवाडी येथील कोविड रुग्णालयात कार्यान्वित करण्यात आले असून इतर व्हेंटिलेटर पुणे महानगरपालिका आणि ससूनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे