लोणावण्याच्या लायन्स पॉईंट दरीत पडून २१ वर्षीय युवतीचा मृत्यू

लोणावळा, पुणे २२ फेब्रुवारी २०२३ : बुधवारी लोणावण्याच्या लायन्स पॉईंटच्या दरीत पडलेल्या एका २१ वर्षीय युवतीचा मृतदेह गुरुवारी सकाळी बाहेर काढण्यात लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्रच्या बचाव पथकाला यश आले आहे. साक्षी रमेश होरे (वय २१, रा. म्हासाडे कान्हूरकर वस्ती, दावडी, खेड, पुणे) असे या मुलीचे नाव असून ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. मिळालेल्या माहितीनुसार साक्षी हिचे चुलते विकास किसन होरे यांनी (वय ३८, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. साक्षी ही आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात शिकत होती. बुधवरी ती एकटीच लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे फिरायला आली होती. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ती लायन्स पॉईंटच्या एका कड्यावरून दीडशे ते दोनशे मीटर खोल दरीमध्ये पडली. त्याठिकाणी कड्याच्या वर एका ठिकाणी एक बॅग आणि चप्पल आढळून आल्याने तेथील एका व्यावसायिकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळवली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शिवदुर्ग मित्र या रेस्क्यू पथकाला पाचारण केले. रात्र असल्याने सकाळी लवकर शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गुरुवारी सकाळी सहा वाजता शिवदुर्ग बचाव पथक लायन्स पॉईंट या घटनास्थळी दाखल झाले. लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, विजय गाले, सीताराम बोकड, सचिन शेलार हे देखील लायन्स पॉईंट या ठिकाणी पोचले होते. साहित्याची जुळवाजुळव करत रेस्क्यू पथकातील काही तरुण रोप च्या सहाय्याने दरीमध्ये उतरले. ज्या ठिकाणाहून मुलगी खाली पडली होती, त्या ठिकाणी खाली जाऊन शोध घेतला असता केवळ एका तासात दगडांमध्ये साक्षी हिचा मृतदेह मिळून आला. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदरचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने दरीमधून वर काढण्यात आला.

शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील योगेश उंबरे, ओंकार पडवळ, सचिन गायकवाड, योगेश दळवी, महेश मसने, आदित्य पिलाने, सिध्देश निसाळ, कुणाल कडु, अशोक उंबरे, यश सोनावणे, विनायक शिंदे, मयुर दळवी, रमेश कुंभार, गौरव कालेकर, कपिल दळवी, समीर देशमुख, अशोक उंबरे, राजेंद्र कडु, आयुष वर्तक, अनिल आंद्रे, सुनिल गायकवाड यांनी सदरचे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केले. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिकचा तपास करत असून ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा