भीमटेकडी येथे २४ वी बौद्ध महिला धम्मपरिषद उत्साहात

छत्रपती संभाजीनगर, २८ फेब्रुवारी २०२२ : शहरातील भीमटेकडी येथे विश्वशांती बुद्धविहारात रविवार (ता. २७) व सोमवारदरम्यान (ता. २८) दोन दिवसांच्या २४ व्या बौद्ध महिला धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेची सुरवात हर्सूल कारागृह ते भीमटेकडीपर्यंत भव्य मिरवणूक काढून करण्यात आली.

या परिषदेला पू.भिक्खुणी धम्मशीला महाथेरो, भिक्खुणी चंदिमा थेरो, भिक्खुणी गौतमी (बांगलादेश), रूपनंदा, धम्मनंदा, संघशीला, पौर्णिमा, धम्मनायना, संघमित्रा, धम्ममेधा, सुमनजी यांच्यासह भिक्खुणी संघाच्या उपस्थितीत धम्मदेसना देण्यात आली.

या परिषदेचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्धाटनप्रसंगी आनंदराज आंबेडकर म्हणाले की, या देशात ८४ हजार बुद्ध विहार व लेणी आहेत. तो ऐतिहासिक वारसा शोधण्यासाठी भिक्खू संघाने पुढाकार घेतला पाहिजे. समाज तुमच्या पाठीशी आहे. भिक्खू संघ शाळा व रुग्णालय चालवीत आहे. उपासक, उपासिकांनी भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांच्या पाठीशी उभे राहावे, असेही आनंदराज आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले.

आज दुसऱ्या दिवशी डॉ. बी. आर. आंबेडकर १०० बेडच्या हॉस्पिटलच्या फाउंडेशनचे उद्धाटन होणार आहे; तसेच संध्याकाळी भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला राहुल आन्वीकर, कडुबाई खरात, अजय देहाडे, मेघानंद जाधव, वाघ साहेब, राजाभाऊ शिरसाठ आदी गायकांचा सहभागी असणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा