मुंबई, २९ एप्रिल २०२३: मुंबई मेट्रोमधून आता जेष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विधार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. एक मे महाराष्ट्र दिनापासून २५ टक्के सवलत त्यांना मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुंबई १ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या या श्रेणीतील हजारो प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे.
महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एम एमआरडीए यांच्यातर्फे महाराष्ट्र दिनाची ही भेट असणार आहे. जेष्ठ नागरिक, विधार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना ४५ ट्रिप किंवा ६० ट्रिपसाठी मुंबई-१ पासवर ही सवलत मिळेल. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे.
आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे. तर महिलांना एसटी बसेसमधून ५० टक्के प्रवास सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हे निर्णय आम्ही घेतले असून मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी मला आशा आहे. असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर