मुख्याध्यापिकेच्या दहशतीला कंटाळून २५० विद्यार्थिनींनी १५ किलोमीटर चालत गाठले तहसील; कळवण येथील प्रकार

नाशिक, २ मार्च २०२३ : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेने या विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यामुळे व्यथित झालेल्या शाळेत शिकणाऱ्या २५० विद्यार्थिनींनी १५ किमी पायी जात तहसील कार्यालय गाठले व तहसीलदारांची भेट घेऊन दिलासा देण्याची मागणी केली. विद्यार्थिनींच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर तहसीलदारांनी मुख्याध्यापिकेला पदावरून हटविले आहे.

भविष्यात पुन्हा अशा समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे आश्वासन तहसीलदारांनी विद्यार्थिनींना दिले आहे. प्रकरण कळवण तहसीलचे आहे. १५ किमी पदयात्रा करीत तहसील मुख्यालयात पोचलेल्या विद्यार्थिनींना आदिवासी विभागातील प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे यांना भेटायचे होते. यासाठी विद्यार्थिनींनी तहसीलदार बी. ए. कापसे यांना भेटण्यासही नकार दिला.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष विजय कुमार यांनी चिडलेल्या विद्यार्थिनींना शांत करण्याचा खूप प्रयत्न केला; मात्र काही उपयोग झाला नाही. प्रकल्प अधिकारी नरवडे हे अधिकृत दौऱ्यानिमित्त बाहेरगावी गेल्याने तहसीलदार बी. ए. कापसे यांनी विद्यार्थिनींशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांची समस्या सोडविली जाईल, असे आश्वासन दिले. यानंतर विद्यार्थिनींनी आपल्या व्यथा मांडल्या.

विद्यार्थिनींनी तहसीलदारांना सांगितले की, त्यांच्या मुख्याध्यापिका केवळ विद्यार्थिनींचाच नव्हे, तर शाळेत तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचाही अपमान करण्याची संधी सोडत नाहीत. त्या सर्वांसाठी अपमानास्पद आणि जातिवाचक शब्द वापरतात. त्यांच्या या वर्तनामुळे संस्थेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्या आदेशानुसार मुख्याध्यापिकेला पदावरून हटविले. त्याचबरोबर त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

विद्यार्थिनींसाठी तहसीलमध्ये भोजनाची व्यवस्था
मुख्याध्यापकांच्या विरोधात तक्रार घेऊन विद्यार्थिनींनी मंगळवारी (ता. २८) सकाळी ९ वाजता मोर्चा काढला. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्या तहसील कार्यालयात पोचल्या. ही बाब समजल्यानंतर प्रशासनाने या सर्व विद्यार्थिनींच्या भोजनाची व्यवस्था तहसील आवारातच केली. त्याचवेळी त्यांना परतण्यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस मागविण्यात आली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा