मनसेच्या 250 कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक, 135 मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरून अजान, राज ठाकरेंचा दावा

मुंबई, 5 मे 2022: महाराष्ट्रातील मशिदींमधून लाऊडस्पीकर काढण्याच्या राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी अजानच्या वेळी हनुमान चालीसा चालवली. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी त्या मनसे कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी भादंवि कलम 505 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय.

या कार्यकर्त्याने हनुमान चालिसाच्या वेळी दुसऱ्या मोबाईलमध्ये अजान वाजवून व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा आरोप पोलिसांनी केलाय. ज्यावेळी हा व्हिडीओ बनवण्यात आला त्यावेळी कांदिवलीतील कोणत्याही मशिदीत अजान झाली नव्हती.

मनसेच्या 250 कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक

अजानला विरोध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी काही मशिदींजवळ लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचं पठण केलं. त्याचबरोबर हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्या किंवा पाठ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या 250 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

‘135 मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरून अजान’

राज ठाकरेंनी उद्धव सरकारला मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचा अल्टिमेटम दिलाय. ज्या ठिकाणी लाऊडस्पीकरवरून अजान दिली जाते त्या सर्व ठिकाणी मनसे कार्यकर्ते हनुमान चालीसाचं पठण करतील, असे ते म्हणाले होते. पोलिसांनी मशिदींमध्ये जाऊन लाऊडस्पीकरचे आवाज तपासले. अनेक मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वाजवले जात नव्हते.

त्याचवेळी राज ठाकरे म्हणाले, मुंबईत 1400 मशिदी आहेत, 135 मशिदींमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश झुगारून लाऊडस्पीकरवरून अजान वाजवण्यात आली. मला सरकारला विचारायचं आहे की त्यांच्यावर काय कारवाई झाली?

राज ठाकरेंनी दिला इशारा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा उद्धव सरकारला मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याचं आवाहन केलंय. राज ठाकरे म्हणाले, मुंबईतील 90 टक्के मशिदीत लाऊडस्पीकर वापरले गेले नाहीत. मला आनंद आहे की मशिदींनी आमचं म्हणणं ऐकलं, यासाठी आम्ही त्यांचे आभार मानू इच्छितो, परंतु जे पालन करत नाहीत त्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. सर्व मशिदींमधून ध्वनिक्षेपक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवू, हे एका दिवसाचं आंदोलन नाही.

पवारांनी लाऊडस्पीकरवर बोलावली बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारची बैठक बोलावली आहे. लाऊडस्पीकरच्या वादावरून ही बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये राज्यातील कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्व बडे नेते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा