श्रीनगर, १५ नोव्हेंबर २०२०: युद्धबंदी असून देखील पाकिस्तान सातत्याने गोळीबार करत आला आहे. या गोळीबाराच्या आड पाकिस्तान आपले दहशतवादी भारतामध्ये पाठवण्याचे काम करत असतो. आता पाकिस्तान भारतात अडीचशे ते तीनशे दहशतवादी भारतात पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफचे आयजी राजेश मिश्रा यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ‘नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात फायरिंग करण्यात आली. पाकिस्तानमधून २५० ते ३०० अतिरेकी घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पण आमची सेना आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) सज्ज आहेत. कोणतंही कारण नसताना पाकिस्तानने गोळीबार केला.’
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या या गोळीबारात भारताचे ५ जवान शहीद झाले. तर ४ नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. तर १९ लोकं जखमी झाले आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या ८ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. आयजी राजेश मिश्रा म्हणाले की, सेना आणि बीएसएफ सैनिकांनी धैर्याने सामना केला. आमचे सैनिक आणि नागरिकांचे नुकसान झाले आहे. नागरी मालमत्तेचे नुकसान झाले. आम्हीही जोरदार उत्तर दिले. आम्ही त्यांचे अनेक बंकर नष्ट केले. यामध्ये मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित झाला पाहिजे. पाकिस्तानने सामान्य नागरिकांना लक्ष्य केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान अस्वस्थ आहे. तर भारताच्या या कारवाईने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. दुसरीकडे, दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य मदत करत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे