पुणे, २३ फेब्रुवारी २०२३ : शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बारा ते पंधरा लाख अशा स्वरूपात रकमा घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे (रा. पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात ४४ जणांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे शिक्षक असून, त्यांच्या नातेवाईक महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. याच दरम्यान दादासाहेब दराडे हे त्यांच्या संपर्कात आले. त्यांनी शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगितले.
सूर्यवंशी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसर येथे १२ आणि १५ लाख असे एकूण २७ लाख रुपये घेतले; परंतु नोकरी न लावल्याने फिर्यादीने पैसे मागितले तरीही त्यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य ४४ लोकांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा दाखल होताच आयुक्त दराडे यांनी वृतपत्रात निवेदन देत भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांच्याशी आपला काहीही संबंध नाही, असे शिक्षण आयुक्त शैलजा दराडे यांनी जाहीर केले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर