२९ वा नामविस्तारदिन सोहळा उत्साहात साजरा; डॉ. बाबासाहेबांना अभिवादनासाठी लोटला जनसागर

औरंगाबाद, १४ जानेवारी २०२३ : आंबेडकरी अनुयायांच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनलेल्या नामांतर लढ्यानंतर विद्यापीठाच्या कमानीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिमाखात झळकल्याच्या घटनेचा २९ वा नामविस्तारदिन सोहळा शनिवारी (ता. १४) उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ‘भीमराया, घ्या तुम्ही या लेकरांची वंदना’ या भावनेतून विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे दर्शन घेण्यासाठी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला होता.

‘जय भीम’चा नारा देत भीमसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. नामविस्तारदिन वर्धापन सोहळ्यानिमित्त अभिवादन फेरी, वाहनफेरीने आंबेडकरी जनता सकाळपासूनच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी दर्शनासाठी गर्दी करीत होते.
आज संध्याकाळी विविध पक्ष-संघटनांकडून भीमगीत, भाषणसह विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. सकाळीच समता सैनिक दलाकडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.

शनिवारी (ता. १४) नामविस्तार दिन सोहळ्यात एकाच दिवसात हजारो पुस्तकांची विक्री झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मकथन, बुद्ध आणि त्यांचा धम्म, बहिष्कृत भारत या प्रबोधनात्मक पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन सोहळा एक असा सोहळा आहे जेथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. यामुळेच या भागात अन्य स्टॉलच्या तुलनेत पुस्तकांचेच स्टॉल मोठ्या प्रमाणात असतात. प्रत्येक स्टॉलवर पुस्तके घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक झाल्यानंतर आंबेडकरी जनतेची पावले वळत होती ती पुस्तकांच्या स्टॉलकडे. महात्मा जोतिराव फुले, माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सत्यशोधक विचारधारा या पुस्तकांना चांगली मागणी होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनाले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा