मुंबई, 16 एप्रिल 2022: शुक्रवारी रात्री मुंबईतील माटुंगा आणि दादर रेल्वे स्थानकादरम्यान पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे (11005) तीन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्य रेल्वेच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दोन्ही बाजूने येणाऱ्या गाड्या रेल्वे मार्गावर थांबवण्यात आल्या आहेत. माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9.45 वाजता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसचे इंजिन माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ पुद्दुचेरी एक्स्प्रेसला धडकल्याने हा अपघात झाला. दादर स्थानकातून एकाच वेळी दोन एक्स्प्रेस गाड्या निघाल्या होत्या आणि दोन रुळ एकमेकांना ओलांडत असलेल्या ठिकाणी ही टक्कर झाल्याचे कळते. त्यामुळे पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे मागील तीन डबे रुळावरून घसरले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
जीआरपी मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ते अडकलेल्या प्रवाशांसाठी मदतीची व्यवस्था करत आहेत. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत सहकार्य करून 1512 डायल करण्याची विनंती केली आहे.
त्याचवेळी अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघातामागे रेल्वेची सिग्नल यंत्रणा असल्याचे मानले जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे