UAE विमानतळाजवळ ड्रोन हल्ल्यात 2 भारतीयांसह 3 ठार

UAE, 18 जानेवारी 2022: संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला झाल्याची बातमी आहे. सोमवारी येथे दोन स्फोट झाले. हे हल्ले ड्रोनच्या मदतीनं करण्यात आल्याचे यूएईच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

हौथीने स्वीकारली या हल्ल्याची जबाबदारी

तपास सुरू होण्यापूर्वीच, येमेनच्या इराण-संलग्नित हुथी चळवळीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेने युएईवर हल्ले करणार असल्याचं निवेदन जारी केलं आहे. हौथींनी भूतकाळात अनेक हल्ले केल्याचा दावा केलाय, जो नंतर अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी नाकारला.

एजन्सीनुसार, अबू धाबी पोलिसांनी सांगितलं की, औद्योगिक मुसाफा परिसरात तीन इंधन टँकर ट्रकचा स्फोट झाला. ADNOC या तेल कंपनीचं इंधनाचं दुकान येथे आहे. अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका बांधकामाच्या ठिकाणी आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांमध्ये 2 भारतीयांचा समावेश

अबू धाबी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. ठार झालेल्यांची ओळख पटली आहे. यामध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. जखमींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ड्रोनने हल्ला होण्याची शक्यता

पोलिसांनी डब्ल्यूएएम या वृत्तसंस्थेवर दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, ‘प्रारंभिक तपासात एका लहान विमानाचे काही भाग सापडले आहेत, जे ड्रोनचे भाग असू शकतात. दोन्ही ठिकाणी ड्रोननं हल्ला केला असण्याची शक्यता आहे आणि आग लागली आहे.

यूएईमध्ये लवकरच लष्करी कारवाई सुरू होणार

येमेनच्या हुथी चळवळीच्या प्रवक्त्याने सांगितलंय की, हा गट यूएईमध्ये लष्करी कारवाई सुरू करणार आहे आणि येत्या काही तासांत त्याची माहिती दिली जाईल.

यापूर्वी सौदी अरेबियाच्या विमानतळालाही लक्ष्य केलं

2019 पासून येमेनमधील UAE ची लष्करी उपस्थिती लक्षणीयरीत्या कमी झालीय, परंतु ती येमेन सैन्याद्वारे आजही कायम आहे. हौथींनी सौदी अरेबियाच्या विमानतळाला लक्ष्य केलं आणि क्षेपणास्त्र आणि ड्रोननं सौदी अरेबियावर वारंवार हल्ले केले. दक्षिण सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोनने हल्ला केल्यानं नागरी विमानाला आग लागली. ऑगस्ट 2021 मध्ये, हुथींनी सौदी विमानतळाला लक्ष्य केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा