रायपूर, ७ जुलै २०२३: आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडच्या एक दिवसीय दौऱ्यावर रायपूरला पोहोचले. येथे ते सुमारे ७,६०० कोटी रुपये खर्चाच्या, १० प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीसह एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
या सगळ्यातच बिलासपूरमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. रतनपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांसह रायपूरला जाणारी बस थेट ट्रेलरला धडकली. या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी ३० हून अधिक जण जखमी झाले. ही धडक इतकी भीषण होती की बसचे मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ४० कार्यकर्ते होते. आज पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींच्या म्हणण्यानुसार पाऊस खूप जोरात पडत होता. दरम्यान, चालकाला झोप लागल्याने हा मोठा अपघात झाला.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केलीय. भाजपनेही प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत्युमुखी पडलेले हे विश्रामपूरच्या शिवनंदनपूर मंडळाचे भाजप कार्यकर्ते आहेत. सज्जन आणि रूपदेव अशी मृतांची नावे आहेत. सज्जन यांचे वय ३० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ते जयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमदई गावचे रहिवासी आहे. त्याचवेळी रूपदेव यांचे वय ५५ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या विश्रामपूरच्या भाजप मंडळ अध्यक्षा लीलू गुप्ता याही जखमी झाल्या आहेत. याशिवाय भाजपचे अन्य चार कार्यकर्तेही जखमी झाले असून, त्यांना सध्या बिलासपूर येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड