भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद ३१४ धावा; पंत अन् अय्यरमुळे भारताकडे ८० धावांची आघाडी

पुणे, २४ डिसेंबर २०२२ : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला जात आहे. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ३१४ धावा केल्या आणि पहिल्या डावाच्या जोरावर ८७ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात बांगलादेशने एकही विकेट न गमावता सात धावा केल्या. भारताकडे ८० धावांची आघाडी आहे.

भारताने दुसऱ्या दिवशी आपला पहिला डाव बिनबाद १९ धावांपासून पुढे सुरू केला. मात्र बांगलादेशचा फिरकीपटू तैजुल इस्लामने आधी केएल राहुलला १० धावांवर त्यानंतर शुभमन गिलला २० धावांवर पायचीत बाद करीत भारताचे दोन्ही सलामीवीर माघारी धाडले. त्यानंतर विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी पहिला सेशन खेळून काढण्याच्या इराद्याने भागादारी रचण्यास सुरवात केली. या दोघांनी भारताला ७३ धावांवर पोचवले असतानाच तैजुलने ही जोडी फोडली. त्याने पुजाराला २४ धावांवर बाद केले. यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भारतीय डावाची धुरा सांभाळत दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी केली; मात्र दोन्ही खेळाडूंचे शतक हुकले. पंतने १०५ चेंडूत ९३, तर अय्यरने १०५ चेंडूत ८७ धावा केल्या. या दोघांनी भारताची धावसंख्या ९४/४ वरून २५३/५ पर्यंत नेली. मात्र, पंत बाद होताच भारताचा डाव गडगडला. भारताने शेवटच्या सहा विकेट ६२ धावांत गमावल्या.

बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. शाकिब अल हसनने सिराजला नुरुल हसनच्या हाती यष्टिचित करून भारताचा डाव संपवला. सिराजने १५ चेंडूंत सात धावा केल्या. अहमद आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. भारताने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या जोरावर भारताने ८७ धावांची आघाडी घेतली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा