जालना ७ जानेवारी २०२४ : मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी बहार व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यास मोसंबी मध्ये परिवर्तन शक्य आहे, असे मत धाराशीव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.एम.बी. पाटील यांनी व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, जालना यांच्या वतीने “मोसंबी बहार व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन” या विषयावर आयोजित कृषि विज्ञान मंडळाच्या ३१७ व्या शेतकरी मासिक चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
मोसंबीचा चांगला बहार घेण्यासाठी रात्रीचे तापमान तीन आठवड्यापर्यंत १४ अंश सें. असेल तर मोसंबी बाग सुप्त अवस्थेत जाते आणि मोसंबीला चांगला बहार येऊन फुले मोठ्या प्रमाणात लागतात. मोसंबीच्या बागेला शिफारशी प्रमाणे सेंद्रिय खत व रासायनिक खत योग्य पद्धतीने द्यावे तसेच संजीवकांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पुढील मोसंबीची फळगळ होणार नाही व शाश्वत उत्पादन घेता येईल असे प्रतिपादन डॉ.एम. बी. पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक तथा मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषीरत्न विजयअण्णा बोराडे हे होते. तर परभणी येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्रज्ञ डॉ.गजेंद्र जगताप, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ.एस.व्ही.सोनुने, कीटकशास्त्रज्ञ प्रा.अजय मिटकरी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. या चर्चासत्रास शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी