कृषि विज्ञान केंद्र जालन्यात ३१९ वे मासिक चर्चासत्र संपन्न

जालना ६ मार्च २०२४ : शेतीमध्ये अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी दुय्यम शेतीकडे वळावे असे आवाहन भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुणे येथील प्रधान शास्त्रज्ञ डॉ.शाकीर अली सैय्यद यांनी केले आहे. खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या कृषि विज्ञान मंडळाच्या ३१९ व्या मासिक चर्चासत्र प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे सचिव तथा कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयआण्णा बोराडे यांची उपस्थिती होती. कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांचेसह रिलायन्स रिटेल लि. मुंबईचे महाव्यवस्थापक दत्तात्रय मोरे आणि कृष्णा ऍग्रीसोल्युशन्सचे संचालक नंदकुमार साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अली पुढे बोलतांना म्हणाले की, शेतकऱ्यांनी स्वतःला उद्योजक समजून फायद्याची शेती करायला हवी. केवळ उत्पादनावर भर न देता प्रक्रिया व मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित करून मार्केटिंगवर जास्त काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक कृषिरत्न विजयआण्णा बोराडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शेतीमधील नवीन बदल शेतकऱ्यांनी स्विकारायला हवेत. सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नियंत्रित शेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले. या चर्चासत्रास जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात शेडनेटधारक शेतकरी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा