१० मे पर्यंत देशभरात धावल्या ३६६ ‘श्रमिक विशेष गाड्या’

नवी दिल्ली, दि. ११ मे २०२०: कोविड-१९ महामारीचा उद्रेक झाल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये लॉकडाऊनच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. यामुळे देशामध्ये अनेक कामगारवर्ग, यात्रेकरू, पर्यटक तसेच विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले. अशा अडकलेल्या लोकांना आपल्या राज्यात, घरी पोहचता यावे यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे खात्याच्यावतीने विशेष श्रमिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानुसार भारतीय रेल्वेने दि. १० मे २०२०  पर्यंत देशभरामध्ये एकूण ३६६ ‘श्रमिक विशेष’ गाड्या सोडल्या. यापैकी आत्तापर्यंत २८७ गाड्या आपल्या गंतव्यस्थानी पोहचल्या आहेत; तर ७९ गाड्यां सध्या आपआपल्या मार्गांवर धावत आहेत.

या २८७ गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश (१ गाडी), बिहार (८७ गाड्या), हिमाचल प्रदेश (१ गाडी), झारखंड (१६ गाड्या), मध्य प्रदेश (२४ गाड्या), महाराष्ट्र (३ गाड्या), ओडिशा (२० गाड्या), राजस्थान (४ गाड्या), तेलंगणा (४ गाड्या), उत्तर प्रदेश (१२७ गाड्या), पश्चिम बंगाल (२ गाड्या) यांचा समावेश आहे.

या गाड्यांमधून तिरूचिरापल्ली, तितलागड, बरौनी, खांडवा, जगन्नाथपूर, खुर्दा रोड, प्रयागराज, छपरा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपूर, हतिया, बस्ती, कटिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहरसा इत्यादी गावांमधल्या श्रमिकांना त्यांच्या गृहगावी पोहचविण्‍यात आले.

या श्रमिक रेल्वेमधून एकाचवेळी जास्तीत जास्त १२०० प्रवाशांना पाठवण्यात आले. सामाजिक अंतर राखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. तसेच या सर्व प्रवाशांची गाडी सुटण्यापूर्वी आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच प्रवासाच्या काळात सर्वांना मोफत भोजन आणि पाणी देण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा