पुणे, २८ एप्रिल २०२१: राज्यात मुंबईनंतर पुण्यामध्ये सर्वात जास्त कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची पुण्यात प्रचंड कमतरता भासत आहे. यामुळं मृतांचा आकडा देखील वाढत चालला आहे. पुणे शहरात काल नव्यानं ३ हजार ८७१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६ हजार ५२६ इतकी झालीय.
मात्र, दिलासादायक बाब म्हणजे काल शहरांतील ६ हजार १५९ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ५४ हजार ८४० झालीय. पुणे शहरात काल एकाच दिवसात १६ हजार ६५० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ६६ हजार ८१३ इतकी झालीय.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४५ हजार ०७५ रुग्णांपैकी १,३६८ रुग्ण गंभीर तर ६,७१४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्यानं ५७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. कालच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ६११ इतकी झाली आहे.
पुण्यात मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी?
पुण्यात मृतांच्या आकडेवारीची लपवाछपवी होत असल्याचं समोर येत आहे. महापालिकेच्या आकडेवारीत आणि विद्युत विभागाच्या आकडेवारीत तफावत आहे. महापालिकेकडे १ ते २५ तारखेपर्यंत १ हजार ८०७ मृतांची नोंद झालीय. तर विद्युत विभागाकडे १ हजार ९४१ इतके अंत्यसंस्कारासाठी पास आलेत. विद्युत विभागानं पास दिल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊच शकत नाही, मग महापालिका आणि विद्युत विभागाच्या आकडेवारीत फरक कसा ?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. तर ससून रुग्णालय, जम्बो कोव्हिड सेंटर, नायडू हॉस्पिटलमधील आणि बाणेर हॉस्पिटलमधील कोरोना मृतांचे अंत्यसंस्काराचे पास तयार होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे