डोंबिवलीत देवाचे नाव घेऊन ३९ हजारांची फसवणूक….

डोंबिवली, १४ ऑगस्ट २०२०: देवाच्या कामासाठी सिरीयल नंबर असलेल्या नोटा पाहिजे असल्याचे सांगून दोन भामट्यांनी एका दुकानात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याची ३९ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा रोडवर असलेल्या प्रीमियम पेंटसच्या दुकानात शुभांगी जाधव या नेहमीप्रमाणे काम करत होत्या. ४५ ते ५० वयोगटातील एक व्यक्ती दुकानाच्या काउंटरवर येऊन थांबली. त्यांनी जाधव यांच्या हातात पाचशेची नोट देऊन सांगितले की, देवाच्या कामासाठी CL सिरियलच्या नोटा पाहिजेत. काऊंटरमध्ये असलेल्या नोटा तपासल्या. मात्र, त्यात CL सिरीयलनंबरची नोट नव्हती.

त्याचवेळेस दुकानात अंदाजे पंचवीस वर्षाचा तरुण मुलगा आला. त्याने दुकानात पहिल्या आलेल्या व्यक्तीला विचारणा केली. त्याने सांगितले की मला देवाच्या कामासाठी CL सिरीयलच्या नोटा हव्या आहेत. मात्र या मॅडम देत नाहीत, तरुणाने दुकानातील महिलेला विनंती केली की त्यांना देवाच्या कामासाठी नोट हवी आहे. तुमच्याकडे असेल तर द्या. काऊंटरमध्ये चाळीस हजाराचा एक बंडल होता. त्या बंडलमध्ये सिरीयल नंबरच्या नोटा असतील म्हणून त्यांना तो बंडल चेक करायला लावला. त्यानंतर त्यांना बोलण्यात गुंतवून एकाने हात चलाखीने त्या बंडलमधील ३९ हजार रुपये लंपास केले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून टिळकनगर पोलीस फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा