नगरमधील रस्त्याच्या कामासाठी ४.०५ कोटींचा निधी मंजूर; आमदार संग्राम जगताप यांची माहिती

नगर, १५ मार्च २०२३ : नगर शहरातील मनमाड रस्ता बोल्हेगाव ते निंबळक बायपासपर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत सुमारे ४ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे. बोल्हेगाव परिसर हा शहराचे उपनगर म्हणून उदयास येत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती निर्माण होत आहेत.

येथील नागरिकांना दळणवळणाच्या सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला होता. त्यामुळे बोल्हेगाव ते निंबळक बायपास रस्त्यासाठी चार कोटी पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे साडेपाच मीटर रुंदीकरणासह काम होणार आहे. याचबरोबर रस्ता दुरुस्तीसाठी पुढील पाच वर्षे २५ लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. बोल्हेगाव-निंबळक बायपासपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना जवळचा रस्ता उपलब्ध होईल.

विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामामुळे शहराच्या विस्तारीकरणास वाव मिळत आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना खरेदीसाठी व व्यावसायासाठी नगर शहरात येण्यासाठी दळणवळणाची सोय निर्माण होत आहे. त्यामुळे शहराच्या बाजारपेठेत व्यावसाय व आर्थिक उलाढाल वाढणार आहे. या माध्यमातून शहर विकसित होईल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा