औरंगाबाद शहरात चोवीस तासात ४२ नवे कोरोनाबाधित

औरंगाबाद, दि. २८ एप्रिल २०२० :
औरंगाबाद शहरात सोमवारी दि.२७ रोजी, २९ कोरोनाबाधित व मंगळवारी दि.२८ रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत १३ कोरोनाबाधित असे एकूण ४२ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९५ झाली आहे. ४२ पैकी एका रुग्णावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे मिनी घाटीचे वैद्यकीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.
किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिला रुग्णावर घाटीत उपचार सुरू आहेत. त्यामुळे ४२पैकी ४१ कोरोनाबाधित रुग्ण मिनी घाटीत दाखल झाल्याने सध्या मिनी घाटीत एकूण ६० रुग्णांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत. तर घाटीमध्ये एकूण सहा कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत २३ रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. त्यापैकी २१ जण मिनी घाटीत उपचार घेतलेले रुग्ण आहेत. उर्वरीत दोन रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतलेले आहेत. सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले.
काल आणि आजच्या कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त अहवालांमध्ये टाऊन हॉल, नूर कॉलनीतील ११, काळा दरवाजातील १, किलेअर्क परिसरातील १६, असेफिया कॉलनीतील १२, भीमनगर, भावसिंगपुरा मिळून २ असे एकूण ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. ज्यामध्ये २२ पुरूष आणि २० महिलांचा समावेश असल्याचे मनपाच्या डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा