लडाख, २४ सप्टेंबर २०२०: मागील पाच महिन्यापासून लडाख सीमेवर सातत्यानं तणावाचं वातावरण निर्माण होत आहे. हे पाहता भारत देखील आपल्या सीमा बळकट करण्याचा प्रयत्न करत आहे. सीमा बळकट असण्यासाठी तेथील दळणवळण सुलभ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, ही व्यवस्थाच नसेल तर सैन्यांना जलद गतीनं हालचाल करणं कठीण होऊन बसतं. चीनच्या बाजूनं चीननं आपल्या सीमेलगत अनेक रस्त्यांचं बांधकाम केलेय. आता भारत देखील सीमेलगत असलेल्या रस्त्याचं काम जलद गतीनं पुढं नेत आहे. आपल्या सीमा बळकटी करण्याच्या प्रयत्नामधला आजचा दिवस देखील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे.
याचं कारण असं आहे की, रक्षा मंत्री राजनाथ सिंह आज चीनला लागून असलेल्या सीमावर्ती भागात ४३ नवीन पुलांचं उद्घाटन करणार आहेत. हे पुल सैनिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. हे सर्व पूल सीमा रस्ते संघटनेनं (बीआरओ) तयार केले आहेत. हे सर्व पूल देशातील सात राज्यांशी जोडले गेले असून या मुलांचं आज संरक्षणमंत्री उद्घाटन करणार आहेत.
• जम्मू-काश्मीर – १० पूल
• लडाख – ७ पूल
• हिमाचल प्रदेश – २ पूल
• पंजाब – ४ पूल
• उत्तराखंड – ८ पूल
• अरुणाचल प्रदेश – ८ पूल
• सिक्किम – ४
इतकंच नव्हे तर गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये निचिफू बोगद्याची पायाभरणीसुद्धा करतील. हे बांधकाम देखील बीआरओद्वारे केलं जाईल, ज्याच्या मदतीनं सैन्याला सीमेवर जाणं सोपे होईल. या ४३ पुलांपैकी २२ पुल थेट चीन सीमेशी संबंधित आहेत आणि सैन्याच्या हालचाली, वाहनं आणि शस्त्रे घेऊन जाण्याच्या बाबतीत त्यांचं महत्त्व खूप जास्त आहे.
काही दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोहतांग बोगदाही देशाला समर्पित करणार आहेत, ज्याचं सामरिक महत्त्व खूप आहे. जेव्हा चीनच्या सीमेवर तणाव निर्माण होतो आणि भारतीय लष्कर लडाख ते अरुणाचल आणि उत्तराखंड, सिक्कीम पर्यंत सतर्क असते, तेव्हा असे पूल सैन्यास मोठ्या प्रमाणात मदत करतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे