कोकण मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट

मुंबई, १७ मे २०२१: तौत्के चक्रीवादळ येत्या चोवीस तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर पालघर आणि ठाणे जिल्हालाही आजसाठी केशरी ईशारा दिला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि मुंबईत धोक्याचा इशारा दिला असल्यानं, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह, मुंबई अग्निशमन दल, वीज वितरण कंपन्यांसह सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटीही परत आणल्या आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन वरळी सी लिंक दोन दिवसांसाठी बंद ठेवला आहे, तर दहिसर आणि वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड उपचार केंद्रांमधल्या रुग्णांना सुरक्षितरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे.

मुंबईतल्या सर्व चौपाट्यांवर लाइफ गार्डसह, अग्निशमन दलाचे जवान तैनात केले आहेत. याशिवाय किनारपट्टी लगतच्या आणि सखल भागात राहणाऱ्या नागरिकांच्या स्थलांतराची गरज निर्माण झाली तर त्यादृष्टीनं तात्पुरत्या निवाऱ्यांची सज्जताही ठेवली आहे.

या ठिकाणी अन्न, पाण्यासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबल सिंग चहल यांनी दिले आहेत.

चक्रीवादळादरम्यान बोटी अथवा मासेमारी जाळ्यांचं नुकसान झालं, किंवा समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जलचर प्राणी वाहून आल्याचं दिसलं तर मत्स्यव्यवसाय विभागाच्या संबंधित परवाना अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे.

यासाठी किनारपट्टीलगतच्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या विभागाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही विभागानं जाहीर केले आहेत. मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका आणि इतर साधनं सुरक्षित ठेवावीत.

नौका मालकांनी खलाशांची सुरक्षित ठिकाणी सोय करावी. जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यक साधनसामुग्री सोबत बाळगावी, असं आवाहन विभागानं केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा