पुणे, २४ फेब्रुवारी २०२४ : मराठी भाषा गौरव दिनी पुण्यात ४८ वा आंतरजातीय सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. घनश्याम देवरे आणि करिश्मा टापरे यांचा सत्यशोधक विवाह पुण्यातील धायरी परिसरात फुले, शाहू, आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन, पुणे च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे पार पडणार आहे.
हुंडा, मुहूर्त, अंधश्रद्धा, कर्मकांड, इत्यादी अनिष्ट प्रथांना मूठमाती देत नाहक आर्थिक उधळपट्टी न करता महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी व सत्यशोधक विवाहाचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच घनश्याम देवरे हे पेशाने मराठी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक असल्याने मराठी भाषा गौरव दिनी आपल्या पालकांची व नातेवाईकांची संमती घेऊन विवाह करण्याचे ठरवले आहे.
या वधू-वरांची रजिस्टर नोंदणी करून विवाहप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांच्या शुभहस्ते वधू-वरांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व थोर समाज सुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा भेट देण्यात येणार आहे. वधू-वरांच्या पालकांना व मामा-मामींना देखील राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे सन्मानपत्र दिले जाणार आहे. या लग्नाच्या विधिंसाठी विधिकर्ते एकही रुपया न घेता मोफत विधी पार पाडणार आहेत. यावेळी अक्षता म्हणून तांदुळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जाणार आहे. तर महापुरुषांचे ग्रंथ व ज्योती म्हणजेच ज्ञानज्योतीभोवती सप्तपदी घेऊन वर – वधू सोबतीने सात वचने घेणार आहेत. मंगलाष्टकांचे गायन अमित राणे करणार आहे व सर्व विधी सत्यशोधक रघुनाथ ढोक हे महात्मा फुले यांच्या वेशभूषेत करणार आहेत. या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आवर्जून शुभ संदेश व शुभेच्छा दिलेल्या आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : हर्षदा नागपुरे-शेट्टी