गोल पोस्ट इतर सरकारी योजना रेल्वे दुर्घटनेतील मृत कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर : उद्धव ठाकरे

रेल्वे दुर्घटनेतील मृत कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर : उद्धव ठाकरे

औरंगाबाद, दि.८ मे २०२० : औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केले आहे. यात मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले.
परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत आपल्या घरी निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परटतील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version