झारखंडमधील चकमकीत ५ नक्षलवादी ठार, २ एके ४७ रायफल सह शस्त्रसाठा जप्त

44

झारखंड, ३ एप्रिल २०२३: झारखंडमधील चतरा येथे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. यातील दोघांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांची बक्षिसं होती. तर दोघांवर प्रत्येकी ५ लाखांची बक्षिसं होती. त्यांच्याकडून २ एके ४७ सह अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. याठिकाणी अजूनही कारवाई सुरु असल्याची माहिती झारखंड पोलिसांनी दिलीय.

या कारवाईत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांमधील गौतम पासवान आणि चार्ली हे सीपीआय च्या विशेष क्षेत्र समितीचे सदस्य होते. त्यांच्यावर प्रत्येकी २५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. तर नंदू अमर गंझू आणि संजीव भुईयान हे सब-झोनल कमांडर होते. त्यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. पुढील कारवाई सुरू असल्याचं झारखंड पोलिसांनी म्हंटलंय.

पलामू-चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा दलाने शोधमोहीम सुरू केली होती. याच दरम्यान आज सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यात ५ नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यात दोन एके ४७ रायफल, दोन इन्सास रायफल आणि दोन देशी बनावटीच्या रायफल्सचा समावेश आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर