मुंबईच्या मालवणी भागात ५०० च्या बनावट नोटांचा व्यवसाय करणाऱ्याला अटक

मुंबई २४ जून २०२३: समाजात चुकीच्या मार्गाने पैसे कमवणाऱ्या लोकांना एक ना एक दिवस अद्दल घडतेच, मुंबईच्या मालवणी परिसरातील एका तरुणाला त्याच्या कृत्याची अद्दल घडली आहे. मुंबईतील मालवणी परिसरात ५०० च्या बनावट नोटांचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. तपासात पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा ते सुद्धा चक्रावले. आरोपी किती चाणाक्ष पद्धतीने लोकांना फसवत होता हे पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. उमेश जय किशन कुमार(वय ३२ वर्षे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर, कारसह ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामुळे या तरुणासारखे सर्वसामान्यांना फसवणाऱ्यांचे नक्कीच धाबे दणाणले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालवणी पोलीस ठाण्याचे डिटेक्शन अधिकारी एपीआय हसन मुलाणी यांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या होत्या. त्यांना मालवणी परिसरात एका कारमध्ये एक व्यक्ती आला असून त्याच्या हातात काहीतरी संशयास्पद असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर त्यांनी कारवाई करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीकडून ५०० च्या १३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत कळाले की, आरोपी काही दिवसांपूर्वी मालवणी येथे राहायला आला होता आणि त्याने पाचशेच्या अनेक बनावट नोटा बदलून दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, आरोपी कोणत्याही दुकानात सामान घेण्यासाठी जायचा आणि पाचशेच्या नोटा द्यायचा.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा