नवी दिल्ली: माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथील विज्ञानभवनात आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार -६६’ चे वितरण करण्यात आले. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्रालयाचे सचिव रवि मित्तल आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार निवड समितीचे निवडक परिक्षक यावेळी मंचावर उपस्थित होते.
अनेक भाषिक चित्रपटनांही वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. मराठी चित्रपटांसाठी एकूण १० पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळे यास सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा तर प्रसिध्द अभिनेते स्वानंद किरकिरे यांना सर्वोत्तम सहकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘भोंगा’ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा बहुमान
प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेसाठी ‘भोंगा’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शक तथा मंदार- नलिनी प्रोडक्शनचे शिवाजी लोटन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि 1 लाख रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘पाणी’ चित्रपटाला पर्यावरणावरील सर्वोत्तम चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. रजत कमळ आणि १ लाख ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुधाकर रेड्डी येंकटी यांना ‘नाळ’ चित्रपटासाठी पुरस्कार
दिग्दर्शकाचा पदार्पणातील चित्रपट म्हणून ‘नाळ’ या चित्रपटाला ‘इंदिरा गांधी पुरस्काराने’ गौरविण्यात आले. दिग्दर्शक सुधाकर रेड्डी येंकटी आणि निर्माता तथा मृदगंध फिल्म्सचे नागराज मंजुळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रत्येकी स्वर्ण कमळ आणि १ लाख २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रीनिवास पोकळे आणि स्वानंद किरकिरे यांचा सन्मान
‘नाळ’ चित्रपटातील उत्तम अभिनयाकरिता श्रीनिवास पोकळेला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावर्षी चार बालकलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आले. रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यासोबतच. रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘तेंडल्या’ ठरला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा मानकरी
‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम ध्वन्यांकनाचा (लोकेशन साऊंड) पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटात ध्वनीच्या माध्यमातून छोट्या शहराच्या वैविद्यपूर्ण रंगछटा दर्शविण्यात आल्या आहेत. लोकेशन साऊंड रेकॉर्डिस्ट गौरव वर्मा यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
नॉनफिचरमध्येही मराठीचा सन्मान
नॉनफिचर चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आई शप्पथ’ या चित्रपटाला सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिग्दर्शक गौतम वझे यांनी पुरस्कार स्वीकारला. स्वर्णकमळ आणि १ लाख ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘खरवस’ हा सर्वोत्तम लघु काल्पनिक चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक आदित्य जांभळे आणि निर्माती संस्था श्री म्हाळसा प्रोडक्शन पोंडा यांना या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी रजत कमळ आणि ५० हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘ज्योति’ चित्रपटासाठी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत दिग्दर्शक केदार दिवेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. रजत कमळ आणि ५० हजार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी अभिनेता आयुष्मान खुरानाला ‘अंधाधुन’ चित्रपटासाठी ‘बेस्ट अॅक्टर’ म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.
त्यानंतर अभिनेता विक्की कौशलला उरी : द सर्जिकल स्ट्राईक सिनेमासाठी ‘बेस्ट अॅक्टर’ म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला.
साऊथ अॅक्ट्रेस कीर्ती सुरेशला ‘महानती’ या तेलगू सिनेमासाठी ‘बेस्ट अॅक्ट्रेस’ म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला
अभिनेता अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या सिनेमाला ‘बेस्ट सोशल फिल्म’ म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.
बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांना ‘दासाहेब फाळके’ पुरस्काकारानं सन्मान देण्यात आला.