आळंदी पंढरपूर पालखी महामार्गाच्या भूसंपादनासाठी  ६८ कोटी मंजूर: आ. संजय जगताप

पुरंदर, दि.९ सप्टेंबर २०२०: आळंदी ते पंढरपूर मार्गावरील पुरंदर तालुक्यातील भूसंपादनासाठी शासनाच्या वतीने ६८ कोटी रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.     

पुरंदर तालुक्यातून जाणारा आळंदी ते पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. खा. सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पालखी मार्गाचे काम मार्गी लावण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. याबाबत अनेक बैठका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत घेण्यात आल्या होत्या. आता पुरंदर तालुक्यातील एकूण सतरा गावांचे भूसंपादन करण्यासाठी ६८.७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे जगताप यांनी  म्हटले आहे.

पहिल्या टप्प्यातील १७ गावांपैकी १३ गावांचे भूसंपादन प्रक्रिया जानेवारी २०१९ मध्ये सुरु करण्यात आली होती. त्यापैकी सासवड व पवारवाडी वगळता उर्वरित ११ गावांची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सुमारे २३६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी जेऊर, पिसुर्टी, पिंपरी, दौंडज या चार गावांसाठी ६८ कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी २०२० मध्ये प्राप्त झाला. कोरोना संसर्गामुळे मध्यंतरी वाटपाचे काम थांबले होते. परंतु आता वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून ६८ कोटी पैकी १५ कोटी रुपयांचे वाटप  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पूर्ण  केले आहे.
     
या चार गावांसाठी १५ कोटींचे वाटप करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे.

पिसुर्टी ६,४७,३०,६१० रुपये, पिंपरी खुर्द २,९०,२२,९९७ रुपये, दौंडज २,८५,२७,७०० रुपये, जेऊर २,८७,३५,७३२ रुपये. या सर्व गावात १,५१,०१,७०,७३९ निधी मिळाल्याने या गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार संजय जगताप यांचे आभार मानले आहेत.

झेंडेवाडी, काळेवाडी, दिवे, येथील नागरिकांचा भूसंपादन प्रक्रियेला विरोध होता. त्यामुळे येथील भूसंपादन प्रक्रिया पहिल्या टप्प्यात होऊ शकली नाही. भूसंपादन अधिकारी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात आमदारांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर सदरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सासवड येथील नगरपालिका हद्दीतील जमीन धारकांना जास्तीत जास्त मोबदला मिळावा म्हणून गुणांक १ वरून २ करणे बाबत शासन दरबारी आमदार संजय जगताप यांचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित गावांच्या भूसंपादनासाठी अंदाजे १८५ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच पिंपरेखुर्द, पिसुर्टी, जेऊर, दौंडज या गावातील उर्वरित शेतकऱ्यांनी आपसातील काही किरकोळ वाद असल्यास ते बाजूला ठेऊन तातडीने आवश्यक ते कागदपत्रे तसेच बँक खात्याचा तपशील भुसमपदान अधिकारी यांचेकडे जमा करावा असे आवाहन देखील आमदार संजय जगताप यांनी केले आहे .

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा