70% of Women Depend on Alimony After Divorce: आधुनिक काळात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्या तरी, घटस्फोटानंतर अनेक महिलांच्या आयुष्यात मोठे बदल घडत असल्याचे पुणे शहरात दिसून आले आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या घटस्फोटांच्या दाव्यांमध्ये एक धक्कादायक चित्र समोर आले आहे: घटस्फोटानंतर विभक्त झालेल्या सुमारे ६० ते ७० टक्के महिला पोटगीवर अवलंबून असतात. यात सर्वाधिक समावेश गृहिणींचा असतो, ज्यांनी मुलांच्या संगोपनासाठी किंवा कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी आपली नोकरी सोडलेली असते.
पुण्यातील वकील आणि समुपदेशकांनी दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर अनेक महिला पुनर्विवाहाऐवजी मुलांचे संगोपन, स्वतःची नोकरी आणि शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. राहुल आणि काजल (बदललेली नावे) या उच्चशिक्षित दाम्पत्याचे उदाहरण या स्थितीचे उत्तम निदर्शक आहे. दोघांची नोकरी, प्रेमविवाह, आणि नंतर कामाच्या वेळा व करिअरमधील फरकामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. मुलगा झाल्यानंतर काजलने नोकरी सोडली, तर राहुलचे प्रमोशन होऊन तो परदेशात गेला. त्यांच्यातील वाढत्या वादामुळे त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता काजल मुलाचे संगोपन करत असून, तिचा उदरनिर्वाह पोटगीवर सुरू आहे. न्यायालय पोटगी मिळणे हा महिलांचा अधिकार मानते.
छोट्या-मोठ्या वादातून, वैचारिक मतभेदातून किंवा आवडी-निवडीतील तफावतीमुळे शहरातील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांचे दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्न झाल्यावर कुटुंबाला प्राधान्य देणे, जबाबदाऱ्या सांभाळणे आणि मुलांचे संगोपन करणे या कारणांमुळे अनेक महिला नोकरी सोडून गृहिणी होणे पसंत करतात. मात्र, जेव्हा पतीकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तेव्हा अनेक महिला घटस्फोटाचा मार्ग निवडतात, असे जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सांगितले.
ॲड.गायत्री कांबळे, पुणे जिल्हा न्यायालय, यांनी या स्थितीची पुष्टी केली. त्या म्हणाल्या, “घटस्फोट आणि पोटगीची प्रकरणे कौटुंबिक न्यायालयात मोठ्या प्रमाणात दाखल होतात. त्यामध्ये ६० ते ७० टक्के प्रकरणांत गृहिणी पोटगी मिळवण्यासाठी अर्ज करतात. तसेच घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्यांचेही प्रमाण लक्षणीय आहे.”
ही आकडेवारी समाजातील बदलत्या कौटुंबिक संबंधांवर आणि घटस्फोटानंतर महिलांसमोरील आर्थिक आव्हानांवर प्रकाश टाकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे














































