यवतमाळ मध्ये ७० हजारांचे अनधिकृत बियाणे जप्त

यवतमाळ २४ जून २०२३: पांढरकवडा तालुक्यातील करंजी येथे कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत, ७० हजार २५० रुपयांचे अनधिकृत बियाणे जप्त करण्यात आले. याबाबतच्या अधिक माहितीनुसार, पांढरकवडा पंचायत समितीचे कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक सुरेश चव्हाण यांना तालुक्यातील करंजी येथे, पुरुषोत्तम चौधरी हे एका गादी पिंजनालयात अनधिकृत बियाणांची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती.

जिल्हा गुणनियंत्रण पथकातील जिल्हा परिषद कृषी अधिकारी पंकज बर्डे, किशोर अंबरकर, संजय वानखेडे, संदीप वाघमारे व पोलीस पथकांसह करंजी गावात पोहचले. त्यानंतर सदर ठिकाणी झडती घेतली असता त्यांना पांढर्‍या रंगांच्या नायलॉन पोत्यात बियाणांचे पाकीट आढळून आले. त्यातील सर्व बियाणांचे पाकीट तपासले असता, बाहुबली केजी २५, राशी ६५९, एटीएम त्रिशूळ ७६ हे पाकीट सापडले.

त्रिशूल ३०२८ लिहून असलेले विविध प्रकारचे ४७ अनधिकृत बियाणांचे पाकीट सुद्धा आढळून आले. याबाबत पंचायत समिती पांढरकवडाचे कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी पांढरकडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक चौकशी पांढरकवडा पोलिस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा