बिहारमध्ये ‘अग्निपथ’वरून गदारोळ सुरूच, 700 कोटी रुपयांची रेल्वे संपत्ती नष्ट

15

बिहार, 19 जून 2022: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ योजने’वरून देशात अनेक ठिकाणी गदारोळ सुरू आहे. त्याची ठिणगी बिहारमध्ये सर्वाधिक भडकली आहे. रेल्वे स्टेशन असो की बाजारपेठ, सगळीकडे दंगा आणि कोलाहल सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या दुरवस्थेमुळे रेल्वे विभाग चांगलाच त्रस्त झाले आहे. आतापर्यंत रेल्वेची 700 कोटींची मालमत्ता नष्ट झाली आहे. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी खळबळ उडवून दिलीय.

या चार दिवसांत रेल्वेच्या 60 बोगीसह 11 लोकोमोटिव्हला आग लागलीय. पटनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तारेग्ना येथे शनिवारी आंदोलकांनी जीआरपी चौकीसमोर वाहनं जाळली. स्टेशनलाही आग लावण्यात आली. शुक्रवारी आंदोलनाच्या आगीत एकट्या दानापूर रेल्वे विभागात 225 कोटी रुपयांचं नुकसान झालं. दानापूरमध्ये पार्सलची दोन डझनहून अधिक वाहने फोडण्यात आली.

एक एसी बोगी 3.5 कोटींमध्ये बनते

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एक सामान्य बोगी तयार करण्यासाठी सुमारे 80 लाख रुपये खर्च येतो. एक स्लीपर कोच 1.25 कोटींमध्ये आणि एक एसी कोच 3.5 कोटींमध्ये बनतो. रेल्वे इंजिन तयार करण्यासाठी सरकारला वीस कोटींहून अधिक आणि मनुष्यबळ खर्च करावे लागते. 12 डब्यांची पॅसेंजर ट्रेन 40 कोटींहून अधिक खर्चात तयार आहे आणि 24 डब्यांची ट्रेन बनवण्यासाठी 70 कोटींहून अधिक खर्च आला आहे. राजधानी आणि वंदे भारत सारख्या गाड्यांचे उत्पादन 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र कुमार यांनी सांगितलं की, आतापर्यंत 700 कोटींहून अधिकचं नुकसान झालंय. आंदोलकांनी पाच गाड्यांच्या 60 बोगीसह 11 इंजिन पेटवून दिले. रेल्वे संपूर्ण अहवाल तयार करत आहे. या रकमेत डझनभर नवीन गाड्या आल्या असत्या. याशिवाय ट्रॅक विस्कळीत होण्याबरोबरच रेल्वे रद्द झाल्याने रेल्वेचे कोट्यवधींचं नुकसान झालंय.

आतापर्यंत 138 एफआयआर आणि 718 जणांना अटक

बिहारमधील हिंसक निदर्शनांबाबत आतापर्यंत 138 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. यासोबतच 718 जणांना अटक करण्यात आली आहे. बिहारचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था संजय सिंह म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ फुटेजच्या आधारे हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. त्याचवेळी, तणावाची परिस्थिती पाहता 15 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. या जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा 19 जूनपर्यंत बंद राहणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा