रत्नागिरी जिल्ह्यात ७७ कुपोषित बालके

रत्नागिरी,२८ नोव्हेंबर २०२२ : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात ७७ कुपोषित बालके आढळून आली आहेत. त्यांना पोषण आहार आणि औषधे देण्यासाठी ४२ ठिकाणी ग्राम बाल विकास केंद्र सुरु केली आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक सहा महिन्यांनी सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली जाते. जिल्हा परिषदेच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत कुपोषित बालकांची माहिती संकलित केली जाते.

मागील सहा महिन्यापासून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील ७० हजार ४४८ बालकांची तपासणी करण्यात आली. ६७० बालके मध्यम कुपोषीत (मॅम) असून ७७ अति कुपोषित (सॅम) बालके आहेत. कमी वजनाची ६९६ बालके आढळून आलेली आहेत.

अति कुपोषित बालकांची काळजी घेण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली असून या केंद्रामध्ये कुपोषित बालकांना दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार आणि सकस आहार दिला जात आहे. तसेच शासनाकडून देण्यात आलेले एनर्जी न्युट्रीशिअन फुडचे वाटप करण्यात येते.

कमी वजनाची आणि आजारी असलेल्या पाच बालकांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी बालरोग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. दरम्यान, महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात भेट देऊन मुलांच्या पालकांशीही संवाद साधला.

कुपोषित बालकांसाठी पोषण आहार देता यावा यासाठी १५ व्या वित्त आयोगातून निधीची तरतूद ग्रामपंचायतींना करण्याच्या सूचना महिला व बालकल्याण विभागाने दिल्या आहेत. तसेच बाल विकास केंद्रांना लोकसहभागातून किंवा कंपन्यांकडील व्यावसायीक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंडातून आर्थिक सहाय्य घेतले जाते. खेडमध्ये घरडा कंपनीने अशा प्रकारे सहकार्य केले आहे. याबरोबरच रिलायन्स क्लब, रोटरीसारख्या संस्थांकडूनही मदत केली जाते.

रत्नागिरी जिल्हा कुपोषण मुक्त व्हावा यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अधिकार्‍यांची बैठक घेतली असून यामध्ये प्रत्येक विभागाला त्या-त्या पातळीवर नियोजन करण्याची सूचना दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा