नवी दिल्ली, २२ जुलै २०२३ : आज म्हणजेच शनिवार २२ जुलै रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातव्या रोजगार मेळाव्यात ७० हजाराहून अधिक तरुणांना नियुक्तीचे पत्र देणार आहेत. देशातील २० हून अधिक राज्यांमध्ये ४४ ठिकाणी हा विशेष मेळा आयोजित केला जाणार आहे. आज पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात नियुक्तीपत्रे देणार आहेत.
दरम्यान २२ ऑक्टोबर २०२२ रोजी पंतप्रधानांनी रोजगार मेळाव्याचा पहिला टप्पा सुरू केला. तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते, २०२३ च्या अखेरीस देशातील तरुणांना १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याचे आमचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आकडेवारी पाहता, पंतप्रधान मोदींनी गेल्या ८ महिन्यांत ६ रोजगार मेळ्यांमध्ये, ४ लाख ३३ हजारांहून अधिक लोकांना जॉइनिंग लेटर दिले आहेत.
रोजगार मेळाव्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, “आमचे सरकार देशातील तरुण प्रतिभांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्ध आहे. या दिशेने रोजगार मेळ्यांनी स्वत:ची एक महत्त्वाची ओळख निर्माण केली आहे. या मेळ्याच्या उत्तरार्धात, आज सकाळी १०:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ७०,००० हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करण्याचा बहुमान मिळणार आहे.
पीएमओने शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान यावेळी या तरुणांना संबोधित देखील करतील. हा रोजगार मेळा देशभरात ४४ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. या भरती केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केल्या जात आहेत. त्याचबरोबर नवनियुक्त व्यक्तींनाही ‘कर्मयोगी प्रमुख’च्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. कर्मयोगी प्ररंभ हा विविध सरकारी विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या सर्व व्यक्तींसाठी एक ऑनलाइन अभ्यासक्रम आहे.
देशभरातून निवडलेल्या तरुणांची महसूल विभाग, आर्थिक सेवा विभाग, पोस्ट विभाग, शालेय शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन विभाग, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग आणि गृह मंत्रालयात नियुक्ती केली जाईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड