दिल्ली विमानतळावर महिला प्रवाशाच्या शरीरातून कोकेनच्या ८२ कॅप्सूल जप्त, किंमत १५ कोटींहून अधिक

नवी दिल्ली , १८ डिसेंबर २०२२: गिनीच्या एका महिला प्रवाशाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (दिल्ली IGI विमानतळ) पकडण्यात आलं. माहिती मिळताच कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेला थांबवून चौकशी केली. यावेळी अधिकाऱ्यांना काही शंका आल्या. महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या शरीरात ८२ कोकेन भरलेल्या कॅप्सूल असल्याचं आढळून आलं.

यानंतर वैद्यकीय प्रक्रियेअंतर्गत डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्या शरीरातून कॅप्सूल काढण्यात आले. या कॅप्सूलची किंमत १५.३६ कोटी रुपये असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

चौकशी दरम्यान आला संशय

माहितीच्या आधारे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलेला पकडलं. ही महिला ग्रीन चॅनल ओलांडून इंटरनॅशनलच्या बाहेर पडण्याच्या दिशेने येत होती. महिलेनं अंमली पदार्थाच्या कॅप्सूल गिळल्याचं चौकशीत अधिकाऱ्यांनी सांगितलं.

यानंतर अधिकाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं, तिथं तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात महिलेच्या शरीरात काही गोष्टी असल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांना हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनेक दिवस ही प्रक्रिया सुरू होती.

कॅप्सूलमधून काढली १०२४ ग्रॅम पांढरी पावडर

विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ८२ कॅप्सूलमधून एकूण १०२४ ग्रॅम पांढऱ्या पावडरीचे पदार्थ बाहेर आले आहेत. त्याची चौकशी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झालं. त्याची किंमत अंदाजे १५.३६ कोटी रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेविरुद्ध अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा