रशियाची चंद्रमोहिम अयशस्वी, लुना-२५ चंद्रावर कोसळलं

नवी दिल्ली, २० ऑगस्ट २०२३ : रशियाच्या मून मिशनला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-२५ हे यान लँडिंग आधीच क्रॅश झालं आहे. हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं भारताच्या चांद्र यांनाच्या दोन दिवस आधीच म्हणजे उद्याच २१ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रावर पाऊल ठेवणार होतं. पण त्याआधीच रशियाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. कारण रशियाने तब्बल ४७ वर्षानंतर चंद्रमोहिम हाती घेतली होती. मात्र, ही चंद्रमोहिम अयशस्वी ठरली आहे, रशियन अंतराळ संशोधन संस्था रोसकॉसमॉस Roskosmos ने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

रशिया ने जवळपास पन्नास वर्षानंतर चंद्रावरील संशोधन करत आहे. रशियाने १० ऑगस्ट १९७६ मध्ये लुना-२४ पाठवले होते. त्या मोहिमेनंतर जवळपास पाच दशकांनंतर प्रथमच लुना-२५ अंतराळात पाठवण्यात आलं. रशियाने चंद्राकडे जाण्याचा अधिक थेट मार्ग स्वीकारला होता. ११ दिवसांत म्हणजे २१ ऑगस्टला ‘लुना-२५’चंद्रावर उतरणार होतं. हे यान अधिक शक्तीशाली आणि खर्चिक रॉकेटद्वारे चंद्राच्या दिशेने निघाले होते. यानाच्या हलक्या वजनाच्या डिझाईन आणि इंधन साठवणुकीच्या क्षमतेमुळे कमी वेळेत हे यान चंद्राच्या कक्षात पोहचलं होतं. मात्र, चंद्र मोहिम पूर्ण होण्याच्या आधीच हे अंतराळयान क्रॅश झालं आहे.

काल मध्यरात्रीच या यानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर संशोधकांनी या यानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. रशियाच्या स्पेस स्टेशननेही लूना २५ चा संपर्क होत नसल्याचं म्हटलं आहे. चंद्राच्या पृष्ठभागाला धडक दिल्यानंतर लूना-२५ यान भरकटलं आणि या यानाचा संपर्क तुटला असल्याचं सांगितलं जात आहे. आधी आपल्या निर्धारीत मार्गावरून हे यान भरकटलं आणि आणि चंद्राच्या पृष्ठभागाला जाऊन धडकलं. त्यामुळे लूना-२५ हे यान क्रॅश झालं. त्यामुळे रशियाचं चंद्रावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न भंगलं आहे.

या लूना २५ यानाला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायचं होतं. मात्र, चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच यान क्रॅश झालं. चंद्राच्या एका भागाची माहिती घेण्यासाठी हे यान उद्या सोमवारी चंद्रावर उतरणार होतं. या यानाद्वारे चंद्रावरील गोठलेलं पाणी आणि चंद्रावरील किंमती तत्त्वांचा शोध घेतला जाणार असल्याचं संशोधकांनी सांगितलं होतं

चंद्राच्या परिघात या यानाला एका आपत्कालीन स्थितीचा सामना करावा लागला. त्याचं विश्लेषण करण्यात येत आहे, अशी माहिती रशियाची अंतराळ संस्था रॉसकॉसमॉसने स्पष्ट केलं आहे. लूना-२५ हे यान ११ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं. विशेष म्हणजे ही चांद्र मोहीम ही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची एक महत्त्वकांक्षी योजना होती. रशियाला अंतराळातील महाशक्ती बनविण्याचा त्यामागचा प्रयत्न होता.

आता जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चांद्रयान-३ ने आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून १४ जुलै रोजी रॉकेटमधून उड्डाण केले होते. तर रशियाने भारतानंतर जवळपास महिन्याभरानंतर ११ ऑगस्ट रोजी सोयूज २.१ बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन प्रक्षेपण केलं होतं. रशिया आणि भारत दोन्ही देश दोन दिवसांच्या अंतराने चंद्रावर उतरणार होते. आता रशियाचं लुना-२५ क्रॅश झाल्यानंतर जगाचं लक्ष भारताच्या चंद्र मोहिमेकडे लागलं आहे.

भारताचं चांद्रयान-३ एलव्हीएम-३ रॉकेटद्वारे १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता अवकाशात झेपावलं. चांद्रयान-३ अंतराळयान २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची अपेक्षा आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-३ मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा