चीन’नं नेपाळमध्ये कब्जा करत बांधल्या ९ इमारती, नेपाळी नागरिकांनाच मज्जाव

नेपाळ (हुम्ला), २० सप्टेंबर २०२०: नेपाळमध्ये चीनचे विस्तारवादी धोरण कायम चालू आहे. थंड हवेच्या आणि नेपाळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन चीन नेपाळच्या भूमीवर हळूहळू कब्जा करत आहे.

यावेळी प्रकरण नेपाळमधील हुम्ला जिल्ह्यातील आहे. या जिल्ह्यातील नाम्खा गावत चीननं गुप्तपणे इमारत बांधलीय. पण एक-दोन इमारती असत्या तर ठीक, परंतु ९ मोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. चीनची अतिउत्साहीता फक्त इतकीच मर्यादित नाही तर ज्या ठिकाणी त्यांनी इमारती बांधल्या आहेत त्या ठिकाणी नेपाळमधील नागरिकांना प्रवेश करण्यास नकार दिला गेलाय.

गाव पालिकेचे अध्यक्ष विष्णू बहादुर लामा सीमावर्ती भागात फिरायला गेले असता हे उघडकीस आलं. त्यांनी सांगितलं की लिमी गावच्या लप्चा भागात चिनी सैन्यानं एकाच वेळी ९ इमारतींचं बांधकाम जवळजवळ पूर्ण केलं आहे.

कसा झाला खुलासा

गावाच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये तसेच सीमावर्ती भागात या इमारती कोणी व केव्हा बांधल्या याची माहिती घेण्यासाठी गावचे अध्यक्ष विष्णू बहादुर लामा तेथे पोहोचले असता त्यांना त्या बाजुला येण्यास रोखण्यात आलं. लामा यांनी दूरध्वनीवरुन सांगितलं की, माझ्या वारंवार चौकशीनंतर तिथं चिनी सैन्य दलाचे जवान आपलं सामान घेऊन चीनच्या सीमेत दाखल झाले.

त्यांनी लांबूनच मोबाइलमध्ये या इमारतींचे फोटो काढलेत. याबाबत लामा यांनी सांगितलं की, या इमारती दोन्ही देशांच्या सीमेपासून एक किलोमीटर अंतरावर नेपाळच्या दिशेने बांधण्यात आल्या आहेत. ते म्हणाले की, त्यांनी सीमेचे रक्षण करणाऱ्या चिनी सैन्य अधिकाऱ्यांशीही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांना तो परिसर सोडून जाण्यास सांगण्यात आलं.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितलं की, गेल्या वर्षी चीनकडून लिमी ते लापचा दरम्यान रस्त्याचं बांधकाम सुरू असताना त्यावेळी फक्त तीन इमारतींचा पाया उभारला गेला होता. नेपाळच्या निषेधानंतर ते बंद करण्यात आलं. परंतु अचानक ९ इमारती तयार आहेत आणि आतून केवळ फिनिशिंग करण्याचं काम चालू आहे.

गावचे अध्यक्ष लामा म्हणाले की, नेपाळी नागरिकांना, स्थानिकांना त्यांच्या स्वत: च्या जागेत जाऊ दिलं जात नाही, तर चिनी सैनिक आरामात नेपाळी प्रदेशात येत आहेत आणि बांधकाम पूर्ण करण्याचं काम अजूनही सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा