हडपसर, दि. ०१ सप्टेंबर २०२० : गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला गेला आहे. बाप्पाच्या निरोपाची तयारी पूर्ण झाली असून घरगुती गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करण्यात येत आहे. मिरवणूक न होता हौदा मध्ये विसर्जन केले जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या सूचनेचे पालन करून गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. आज आनंद चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत बाप्पाला निरोप दिला जातो. हजारोंच्या संख्येने नागरिक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला आहे.
महापालिकेच्यावतीने हडपसर मुंढवा महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने सात फिरते विसर्जन हौद बनवले असून, पालिकेच्या मुख्य कार्यालयाकडून २ फिरते विसर्जन हौद असे एकूण ९ महापालिकेचे फिरते विसर्जन हौद कार्यरत असणार आहेत.
श्रीं च्या मूर्ती संकलन करण्यासाठी १४ ठिकाणी व्यवस्था केली आहे. अशी माहिती सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, यांनी दिली बनकर म्हणाले कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नागरिकांनी घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे, व गर्दी टाळावी, ज्यांना श्रींचे विसर्जन घरी करायचे नसेल त्यांनी महापालिकेच्या फिरत्या विसर्जन हौदामध्ये करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे