९ वर्षांची कायदेशीर लढाई अन् फक्त १२ सेकंदात ट्विन टॉवर्स जमीनदोस्त

नोएडा, २८ ऑगस्ट २०२२: अखेर नोएडातील सुपरटेकचा ट्विन टॉवर पाडण्यात आला आहे. आज दुपारी २.३० वाजता एक ब्लास्ट घडवून १०२ मीटर ऊंच अशी ही गगनचुंबी इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. ३,७०० किलो स्फोटकांनी नोएडा सुपरटेक ट्विन टॉवर्स पाडण्यात आले.

कुतुबमिनारपेक्षा उंच असणारी ‘एपेक्स’ आणि ‘सेयान’ हे ‘सुपरटेक’ कंपनीच्या मालकीचे ट्विन टॉवर तीन हजार ७०० किलो वजनाच्या स्फोटकांच्या माध्यमातून पाडण्यात आली आहे. ३१ ऑगस्ट २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने नोएडाच्या सेक्टर ९३A मधील भारतातील सर्वात उंच बांधकाम नोएडा ट्विन टॉवर्स बेकायदेशीर घोषित केले. सुप्रीम कोर्टाच्या बेकायदेशीर ठरवण्याच्या आदेशानंतर तीन महिन्यांनी हे ट्विन टॉवर पाडण्यात आले आहे. हा सर्व राडारोडा हटविण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २००६ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प नोएडाचा पहिला सर्वात आलिशान प्रकल्प होता. यामध्ये ७११ खरेदीदारांनी अल्पावधीतच फ्लॅट बुक केले होते. परंतु, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर हे ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश देण्यात आले. यासोबतच सुप्रीम कोर्टाने फ्लॅट बुक केलेल्या खरेदीदारांना सुतासह पैसे परत करण्याचे निर्देश दिले होते.

सुपरटेक एमराल्ड कोर्ट प्रोजेक्टमधील एका थ्री बीएचके फ्लॅटची किंमत १.१३ कोटी रुपये होती. ट्विन टॉवरमध्ये ९१५ निवासी फ्लॅट होते. यापैकी ६३३ फ्लॅटचे बुकिंग झाले होते. कंपनीला १८० कोटी रुपये मिळाले होते. तर व्यवहारांची उर्वरित रक्कम यायची होती. ट्विन टॉवरचे सर्व फ्लॅट विकून कंपनी १२०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. आता कंपनी ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना १२ टक्के व्याजदराने घेतलेले पैसे परत करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार परतावा दिला जाणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश जाधव 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा