अयोध्येत राम मूर्ती बनविणारा ९५ वर्षीय तरुण अवलिया….

अयोध्या, ५ ऑगस्ट २०२० : अयोध्येतील भगवान श्री रामांची मुर्ती बसविण्यात येणार आहे. श्री रामांच्या या उंच मूर्ती साकारण्याचे काम आतापर्यंत १५०० पुतळे साकारणारे एक ” रामच ” करणार आहेत.
या अवलिया शिल्पकाराचे नाव आहे……..राम_सुतार

९५ वर्षीय राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ. स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला आहे. धुळेकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे.

मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ब्राँझ धातूपासून, दगडापासून आणि मार्बलपासून पुतळे घडविण्यात ते तज्ज्ञ आहेत. सध्या ते दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये स्थायिक झाले आहेत. नोएडात त्यांचा सेक्टर ६३ येथे स्टुडिओ असून येथेच ते काही वर्षांपासून अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे, मूर्ती साकारत आहेत.

अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. चीनमधील गौतम बुद्धांच्या पुतळ्यापेक्षाही (२०८ मीटर) रामाचा पुतळा उंच असणार आहे. २० मीटर उंचीचे चक्र ५० मीटर उंचीच्या पायावर असणार आहे. पायाखाली साकारण्यात येणार्‍या डिजिटल संग्रहालयात भगवान विष्णूंचे विविध अवतार असणार आहेत.

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, संसदेतील १६ पुतळ्यांपैकी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांसह मौलाना आझाद यांचे पुतळेही त्यांनी साकारले आहेत. असे ५० हून अधिक पुतळे त्यांनी बनवले आहेत. संसदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसविण्यात आलेला महात्मा गांधी यांचा ब्राँझपासून बनवलेला १६ फुटी पुतळा सुतार यांनी साकारलेला सर्वाधिक लोकप्रिय पुतळा आहे.

१९५० मध्ये राम सुतार हे भारतीय पुरातत्त्व विभागासोबत काम करीत होते. तसेच अजंठा आणि वेरूळ येथील अनेक मूर्तींचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. पद्मश्री, पद्मभूषण आणि टागोर अ‍ॅवॉर्डनेही सुतार यांना सन्मानित करण्यात आले आहे…

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा