९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ९८ व्या साहित्य संमेलनासाठी एक नवा आदर्श तयार होईल- डॉ.अविनाश जोशी

जळगाव २४ नोव्हेंबर २०२३ : अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून ९८ व्या साहित्य संमेलनासाठी एक नवा आदर्श तयार होईल, अशा रितीने हे संमेलन सर्वाच्या सहभागातून यशस्वी करणार असल्याची ग्वाही साहित्य संमेलनाचे आयोजक तथा अमळनेरच्या मराठी वाड:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ‌दिली.

साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देताना डॉ. जोशी म्हणाले की, अमळनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी पूज्य सानेगुरूजींच्या कर्मभूमीत ७२ वर्षानंतर ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे. ही अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व समाजातील मान्यवरांकडे जात जनजागृती करत त्यांचे सहकार्य घेत आहोत. विशेष बाब म्हणजे १९५२ मध्ये अमळनेरला झालेले साहित्य संमेलन ज्या जागेवर झाले होते त्याच जागेवर आणि पूज्य साने गुरूजी ज्या शाळेत शिकले, शिकवले त्या प्रताप महाविद्यालयातच हे संमेलन घेण्यात येत आहे.

संमेलनात कोणते विषय असावे, कोणते कार्यक्रम घ्यावेत यासर्व बाबींबाबत साहित्य महामंडळासोबत होत असलेल्या बैठकातून निश्चिती करत आहोत. त्यासाठी प्रत्येकाला जबाबदारी वाटून देत आहोत. कार्यक्रमासाठी विविध समित्यांचे गठन येत्या आठवडाभरात करण्यात येणार आहे, त्या द्वारे संमेलनाचे कार्य वेगात होईल. विप्रोचे अझीज प्रेमजी व दानशूर श्रीमंत प्रताप शेठ यांच्या कर्मभूमीत होणारे हे संमेलन अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच राज्यासह खान्देशातील सर्व साहित्यिंकांचा समावेश यात करणार आहोत, असे जोशी म्हणाले.

१९५२ व १९८४ नंतर २०२३ मध्ये संमेलन आयोजित करण्यात खुप कालावधी लागण्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, जळगावात संमेलन आयोजन करण्याबाबत तत्कालीन आयोजक संस्था द्विधा मनस्थितीत होत्या. आयोजनात कोण पुढाकार घेणार, कोण सर्व व्यवस्थाचे नियोजन व अंमलबजावणी करणार, कोण कोण मदत करेल या बाबींमुळे ते होऊ शकले नाही. मी व्यवसायाने डॉक्टर असल्याने माझा अनेकांशी व साहित्यिंकांशी परिचय आहे. साहित्य व संस्कृती टिकून राहण्यासाठी माझ्यासह मराठी वाड:मय मंडळाने पुढाकार घेत हे शिवधनुष्य स्विकारले आहे आणि ते यशस्वी करण्याचा आम्हा सर्वांचा निर्धार आहे.

अमळनेर व जळगावच्या संमेलनात खूप मोठी दिग्गज साहित्यिक मंडळी आली होती. त्यांचा हा वारसा पुन्हा यातून चालवला जाणार आहे. ही एक सुवर्ण संधी आहे. अमळनेर तालुकास्तरावरील गाव असले तरी येथे सर्वाच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था चांगली करणार आहोत. परंतु साहित्याच्या सेवेसाठी आपण सर्व एकत्र येणार आहे ही जाणिव सर्वांमध्ये आहे. यासाठी गेल्या पाच वर्षापासून आम्ही महामंडळाकडे पाठपुरावा करत आहोत. हा साहित्योत्सव आहे. त्यामुळे सर्वाचे सहकार्य घेत आहोत. आयोजन संस्था म्हणून दडपण आहे. संमेलन हे ग्रामिण भागातही व्हावे. अनेक साहित्यिकांची गावे ही खेड्यातीलच होती. बहिणाबाई, साने गुरूजी, बालकवी ठोंमरे, ना.धो. महानोर याच्यासारखी अनेक दिग्गज साहित्यिक हे ग्रामिण भागातील. त्यामुळे अमळनेरला संमेलन घेण्यात काहीच अडचण नव्हती. या समेंलनासाठी आयोजकांसह राज्य आणि खान्देशातील साहित्यिकांमध्ये खुप उत्साह दिसून येत आहे. त्यानुसार त्यांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे. काही अडचणी असल्या तरी त्या सोडवणार आहोत. अनेक थोर स्वातंत्र्यवीरांची खान्देश ही जन्मभूमी व कर्मभूमी राहिली आहे. त्यामुळे त्यांचा साहित्य रुपाने असलेला इतिहासही या संमेलनातून मांडला जाणार आहे. अशी इत्यंभुत माहिती आयोजक आणि मराठी वाड:मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी ‌दिली.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ. पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा