दौंड : कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील ‘हार्मोनी ऑरगॅनिक’ या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने घातक रासायनीक घन कचरा कंपनीच्या परिसरातील जागेत खड्डे करुन सोडल्याचा तक्रारीवरून कंपनी बंद ठेवण्याचे आदेश देत कारवाई केली आहे.
या कंपनीचे वीज व पाणी बंद करण्याचे आदेश तत्सम विभागाला देण्यात आले असुन त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या प्रकल्पाचे पाणी बंद केले आहे. मात्र वीज वितरण कंपनीने कुठल्याही प्रकारचे लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती देत कारवाई केली नाही.
या कारवाईचे स्वागत पांढरेवाडीच्या ग्रामस्थांनी केले आहे. नोव्हेंबर महिन्यात पांढरेवाडी ग्रामपंचायत च्या माध्यमातुन प्रदूषण मंडळाकडे तक्रार करण्यात आली होती. हार्मोनीच्या वाढत्या सांडपाणी व वायु प्रदूषणाच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या याचा गांभीर्याने विचार करीत प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंके व त्यांचे सहकारी सूर्यकांत शिंदे, प्रताप जगताप यांनी कंपनीच्या परिसरातील जागेत खड्डे घेऊन प्रत्यक्षात पाहणी करुन योग्य तापसाद्वारे ही कारवाई केली आहे.
कंपनीअंतर्गत परिसरात मोठ्या प्रमाणात घातक रासायनीक घन कचरा सोडल्याचे निष्पन्न झाले होते. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले असुन परिसरातील अन्य बेकायदेशीर साठा व प्रदूषण करणाऱ्या प्रकल्पावर कारवाईची मागणी होत आहे.
कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रात अनेक वर्षांपासून प्रदूषण वाढीच्या तक्रारींचा पाढा वाचला जात आहे. अनेकदा प्रकल्पांना लेखी निवेदनाद्वारे विनंती करुन देखील तसेच प्रदुषण विभाग, औद्योगिक विकास महामंडळ,अन्न व औद्योगीक सुरक्षा विभाग, जिल्हाधिकारी, व तत्सम विभागाकडून वारंवार सुचना करुन देखील प्रदूषणाच्या प्रश्नावर काही प्रकल्प व्यवस्थापक गांभीर्याने घेत नव्हते त्यामुळे या कारवाई ला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या पुढे देखील दोषी प्रकल्पावर कारवाईचे संकेत प्रदूषण मंडळाकडून देण्यात आले असुन त्यामुळे अन्य प्रकल्पांनी प्रदूषणाच्या नियमाचे पालन करणे गरजेचे होणार आहे.
या कारवाईचे स्वागत करीत असुन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळणाऱ्या अनेक प्रकल्पातून अश्याया प्रकारचे प्रदूषण राजरोसपणे होत आहे. मात्र अनेकदा प्रत्यक्षात पुरावे उपलब्ध नसल्याने कारवाई करण्यास अडथळे येत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन याबाबतीत निर्णय घेत अश्या प्रकारच्या बाबींना उजेडात आणण्याचा प्रयत्न केला असून त्यात यश आले आहे.
– छाया नानासो झगडे,सरपंच, पांढरेवाडी